काबुल : अमेरिकेने अखेर 20 वर्षांच्या युद्धानंतर अफगाणिस्तान सोडलं आणि तालिबान्यांनी जल्लोष केला. यानंतर तालिबान्यांनी केलेल्या एका क्रुरतेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात तालिबान्यांनी अमेरिकेला मदत करणाऱ्या एका व्यक्तीला अमेरिकेच्याच हेलिकॉप्टरला टांगून त्याची हत्या केल्याचा आरोप होतोय. याचा एक व्हिडीओ समोर आलाय. यात एका व्यक्तीचा मृतदेह हेलिकॉप्टरला टांगलेल्या स्थितीत दिसत आहे. हा व्हिडीओ कंधारचा असल्याचं सांगितलं जात आहे.
ट्विटरवर अमेरिकेची महिला लेखक लिझ व्हिलरने हा व्हिडीओ ट्विट करत जो बायडन यांच्यावर सडकून टीका केलीय. व्हिलर म्हणाली, “अमेरिकेनंतर असा अफगाण दिसतो आहे… तालिबान्यांनी अमेरिकेला मदत करणाऱ्याला हेलिकॉप्टरला टांगलं आहे. मला उलटी येतेय. अफगाणिस्तानमधील या परिस्थितीला जो बायडन जबाबदार आहे.”
If this is what it looks like… the Taliban hanging somebody from an American Blackhawk… I could vomit. Joe Biden is responsible.
— Liz Wheeler (@Liz_Wheeler) August 30, 2021
या व्हिडीओत एका हेलिकॉप्टरला एक मृतदेह टांगलेला दिसत आहे. हे हेलिकॉप्टर काही काळ हवेत उडतं आणि नंतर खाली येताना दिसत आहे. हा व्हिडीओ तेथील स्थानिकांनी काढला असल्याची शक्यता आहे.
या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तो व्हायरल होतोय. हे हेलिकॉप्टर नेमकं कोण चालवत आहे असाही प्रश्न विचारला जातोय. तालिबानी अमेरिकेचं सर्वात प्रसिद्ध हेलिकॉप्टर उडवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतलेले आहेत का? असाही सवाल विचारला जातोय. मात्र, याआधीही तालिबानी अमेरिकेच्या युद्धसामुग्रीसह दिसले आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टरही चालवू शकता, असा अंदाज वर्तवला जातोय.
अमेरिकेने दहशतवाद विरोधी लढाईत अफगाणिस्तानला अब्जावधी डॉलरचे शस्त्रास्त्र दिले होते. यात युद्ध विमानं, इंबरर ईएमबी 314 सुपर लाईट एअरक्राफ्ट, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर, एमडी-530 एफ हेलिकॉप्टर, सेसना 208 विमान, बेल यूएच-1 हेलिकॉप्टरचा समावेश होता. आता हे सर्व तालिबान्यांच्या ताब्यात आहे. मात्र, काही जाणकार तालिबान्यांकडे हे चालवण्याचं कौशल्य नसल्याचा दावा करत आहेत.
दुसरीकडे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दावा केलाय की तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर जवळपास 28 बिलियन डॉलरची शस्त्रास्त्र जप्त केलीत. हे सर्व शस्त्रास्त्र अमेरिकेने 2002 ते 2017 दरम्यान अफगाणच्या सैन्याला दिली होती. यातील जे शस्त्र नष्ट केली गेली नाही, ते आज तालिबान्यांच्या ताब्यात आहेत.
Allegations on Taliban about Hanging to helicopter and Killing of American Blackhawk in Afghanistan video viral