भेंडी गल्ली ते भोपाळ, फ्रान्समधील वादाचे जगात पडसाद, नेमकं कारण काय?
मुंबईतील भेंडी बाजारापासून ते मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत, जगातील अनेक छोट्या-मोठ्या शहरांत कुठे फ्रान्सचा निषेध केला जात आहे, तर कुठे समर्थन होत आहे.
पॅरिस : फ्रान्समध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद सध्या जगभरात उमटत आहेत. मुंबईतील भेंडी बाजारापासून ते मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत, जगातील अनेक छोट्या-मोठ्या शहरांत कुठे फ्रान्सचा निषेध केला जात आहे, तर कुठे समर्थन होत आहे. इतिहासाच्या शिक्षकाची हत्या, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि चर्चबाहेर झालेला चाकूहल्ला ही या वादाची पार्श्वभूमी आहे. इस्लाम राष्ट्रांकडून फ्रान्सचा आणि पर्यायाने इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा तीव्र/टोकाचा निषेध केला जात आहे. तर या वादानंतर भारताने फ्रान्सला भक्कम पाठिंबा दिला आहे. (All about to know France attack and allover controversy)
थोडक्यात हा वाद सांगायचा झाल्यास, फ्रान्समधील शार्ली हेब्दो या मासिकात 2015 मध्ये छापून आलेलं मोहम्मद पैगंबरांचं व्यंगचित्र, इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांनी विद्यार्थ्यांना दाखवलं. यावरुन या शिक्षाकाची 16 ऑक्टोबरला गळा चिरुन हत्या झाली. या हत्येनंतर संतापलेले राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हा इस्लामी अतिरेक्यांचा हल्ला असल्याचं म्हटल्याने वाद आणखी उफाळला. हा वाद ताजा असतानाच, फ्रान्सच्या चर्चबाहेर एका चाकूधारी व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका वृद्ध महिलेचाही समावेश होता. हा हल्लाही दहशतवाद्यानेच केल्याचा फ्रान्सचा दावा आहे.
नेमका वाद काय?
एका 18 वर्षाच्या तरुणाने 16 ऑक्टोबरला फ्रान्समधील इतिहासाचे शिक्षक सॅम्युएल पेची यांची गळा चिरुन हत्या केली होती. सॅम्युएल हे उत्तर-पूर्व पॅरिसमधील हायस्कूलमध्ये इतिहास हा विषय शिकवत होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावरील चर्चेदरम्यान, सॅम्युएल यांनी शार्ली हेब्दो मासिकात 2015 मध्ये छापून आलेलं मोहम्मद पैगंबराचं व्यंगचित्र विद्यार्थ्यांना दाखवलं. इथेच घात झाला आणि कट्टरपंथीय तरुणाने सॅम्युएल यांचा गळाच चिरला.
राष्ट्राध्यक्षांचा संताप
सॅम्युएल पेची यांच्या हत्येनंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामी दहशतवादाच्या मुसक्या आवळण्याचा संकल्प व्यक्त केला होता. कट्टरतेला प्रोत्साहन देणाऱ्या मशिदी आणि संघटनांवर बंदी घालण्याची तयारी मॅक्रॉन यांनी बोलून दाखवली. मॅक्रॉन यांच्या याच वक्तव्याने इस्लाम राष्ट्रांमधून संताप व्यक्त होऊ लागला. जगातील अनेक राष्ट्रांमधून फ्रान्सचा निषेध तर केलाच पण त्यांच्या उत्पादनांवरही बहिष्काराचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं.
इस्लाम राष्ट्रांमधील कतार, कुवेत, जॉर्डनमध्ये अनेक इस्लाम व्यापाऱ्यांनी, संघटनांनी फ्रान्सची उत्पादनचं हटवली. सीरिया, लिबिया, गाझा पट्टीसारख्या भागात फ्रान्सविरोधात संतापाची लाट उसळली.
चर्चबाहेर चाकूहल्ल्यात तिघांचा मृत्यू
हा सर्व वाद सुरु असतानाच फ्रान्समधील नीस शहरामध्ये नोट्रे डेम चर्चबाहेर एक चाकूधारी व्यक्तीने हल्ला केला. यामध्ये एका 60 वर्षीय महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन काय म्हणाले?
या हल्ल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी, आपला देश दहशतवादासमोर झुकणार नाही, असं ठणकावून सांगितलं. चर्चवरील हल्ल्यानंतर मॅक्रॉन यांनी देशाला शांतता ठेवून, धैर्य आणि एकी कायम ठेवण्याचं आवाहन केलं. मॅक्रॉन यांनीही हा इस्लामिक दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं.
भारताचा फ्रान्सला पाठिंबा
फ्रान्समधील चर्चबाहेर झालेल्या हल्ल्याच भारताकडून निषेध करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, भारत दहशतवादाच्या लढाईत फ्रान्ससोबत असल्याचं जाहीर केलं. पंतप्रधान मोदी ट्विटमध्ये म्हणाले, “फ्रान्समध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. चर्चमध्ये झालेला हल्ला निषेधार्ह आहे. पीडित कुटुंब आणि फ्रान्सच्या नागरिकांप्रती संवेदना आहेत. भारत दहशतवादाविरोधातील लढाईत फ्रान्सच्या सोबत आहे”
I strongly condemn the recent terrorist attacks in France, including today's heinous attack in Nice inside a church. Our deepest and heartfelt condolences to the families of the victims and the people of France. India stands with France in the fight against terrorism.
— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2020
Thank you @MEAIndia. France and India can always count on each other in the fight against terrorism.https://t.co/oXZ0XpKNSZ pic.twitter.com/iGylUYxUB6
— Emmanuel Lenain (@FranceinIndia) October 28, 2020
भेंडी बाजार ते भोपाळपर्यंत निषेध
दरम्यान, फ्रान्समधील वादाचे पडसाद मुंबईतील भेंडीबाजारापासून मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत उमटले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामी दहशवादाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन निदर्शने होत आहेत. मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स पायदळी तुडवण्यात आले.
भोपाळमध्ये निदर्शने
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव जमून, फ्रान्सच्या अध्यक्षांचा निषेध करण्यात आला. भोपाळमधील इक्बाल मैदानातील निदर्शनावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. गुरुवारी आयोजित केलेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने इस्लाम धर्मीय पोहोचले होते. यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे फोटो आणि फ्रान्सचे झेंडे पेटवून देण्यात आले.
पाकिस्तानची प्रतिक्रिया
दरम्यान, एकीकडे इस्लामिक राष्ट्रांकडून फ्रान्सचा निषेध व्यक्त होत असताना, पाकिस्तान शांत कसा राहू शकतो? पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर हल्ला केला. “मॅक्रॉन यांनी इस्लामवर हल्ला करुन आपला इस्लामोफोबियाला वाढवत नेण्याचा मार्ग निवडला. हिंसा करणारे दहशतवादी कोणीही असो, टीका त्यांच्यावर व्हायला हवी, मात्र मॅक्रॉन यांनी इस्लामला टार्गेट करणं हा इस्लामोफोबिया आहे, असं इम्रान खान म्हणाले.
My letter to leaders of Muslim states to act collectively to counter the growing Islamophobia in non-Muslim states esp Western states causing increasing concern amongst Muslims the world over. pic.twitter.com/OFuaKGu2c1
— Imran Khan (@ImranKhanPTI) October 28, 2020
एकंदरीत फ्रान्समधील या घडामोडींचे जगभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. कोणी फ्रान्सच्या बाजूने तर कोणी विरोधात भूमिका जाहीर करत आहेत. पण मुद्दा हा फ्रान्सच्या समर्थनाचा किंवा विरोधाचा नाही, तर जगाने एकत्र येऊन दहशतवादाविरोधात मूठ आवळण्याची गरज आहे.
संबंधित बातम्या:
फ्रान्समध्ये चर्चबाहेर दहशतवादी हल्ला, तिघांचा मृत्यू
(All about to know France attack and allover controversy)