नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : नेदरलँडच्या किनाऱ्याजवळ उत्तरी समुद्रात अग्नितांडव सुरु आहे. नेदरलँडच्या किनाऱ्याजवळ अग्निज्वाळा भडकल्या. एका इलेक्ट्रिक कामुळे 3000 कार धोक्यात आल्या आहेत. जहाजावर 25 इलेक्ट्रिक कार (Electric Car) होत्या. या दुर्घटनेत एका भारतीयाचा मृत्यू झाला. मालवाहतूक जहाज अग्निच्या भक्ष्यस्थानी (Ship Fire) सापडले आहे. या दुर्घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. फ्रीमेंटल हायवे असे या मालवाहतूक जहजाचे नाव आहे. हे जहाज मुळचे पनामाचे आहे. जर्मनीहून त्याचा इजिप्तकडे प्रवास सुरु होता. जहाजावरील अनेक जणांना वाचण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. नेदरलँडमधील भारतीय दुतावसाने एका भारतीय नागरिकाच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला.
अचानक लागली आग
मंगळवारी रात्री अचानक ही आग लागली. त्यात एका भारतीयाचा मृत्यू ओढावला. जहाजावरील अनेक सदस्य होरपळले. तर काहींनी आगीपासून वाचण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. भारतीयाचे शव मायदेशी परत पाठविण्यात येत आहे. याविषयीची माहिती भारतीय दुतावासाने ट्विट करुन दिली.
23 जणांचा वाचला जीव
भारतीय दुतावासाने ट्विट केल्याने या दुर्घटनेची माहिती समोर आली. त्यानुसार, आगीमुळे 20 सदस्य होरपळले. ते धोक्याच्या बाहेर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 23 जणांचा जीव वाचल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली. सदस्यांना वाचविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तसेच तटरक्षक दलाने नावांचा वापर केला.
इलेक्ट्रिक कारमुळे लागली आग
या ताफ्यात 2,857 कार होत्या. त्यात 25 इलेक्ट्रिक कार होत्या. त्यातील एका कारने अचानक पेट घेतला आणि ही आग वाढत गेली. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या प्रयत्नांना फार मोठे यश आले नाही.
350 मर्सिडीज बेंझ
या ताफ्यात 350 मर्सिडीज बेंझ कार होत्या. या आगीत या कारसह इतर कारचे किती नुकसान झाले याची माहिती समोर आलेली नाही. जर या कार कोळसा झाल्या असतील तर हे फार मोठे नुकसान असेल. तसेच यामध्ये नाहक एक बळी पण गेला. समुद्रात अनेक अपघात होतात. पण गेल्या काही दिवसातील ही सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे समोर येत आहे.
आग विझवण्याचे काम
जीव धोक्यात घालून आग विझवण्याचे काम करण्यात आले. जहाजावरील क्रू मेंबर्सने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आग झपाट्याने वाढली. त्यामुळे 20 जण आगीने होरपळले. तर 23 सदस्यांनी समुद्रात उड्या घेतल्या. हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलाच्या जहाजांनी त्यांना वाचवले. आता जहाज समुद्र किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.