Israel-Hamas War | अरबी असूनही जखमींना मदत करीत राहीला, हमासच्या हल्ल्यात झाला ठार, इस्रायलचा हीरो ठरला
हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर शनिवारी 7 ऑक्टोबरला हल्ला केला तेव्हा तेथील सुपरनोव्हा म्युझिक कॉन्सर्टमध्ये रक्ताचा अक्षरश: सडा पाडला.
जेरुसलेम | 15 ऑक्टोबर 2023 : हमासने इस्रायलवर अचानक हल्ला केला तेव्हा दक्षिण इस्रायलच्या एका म्युझिक कॉन्सर्टला हमासच्या अतिरेक्यांनी लक्ष्य केले. तेथे अनेक ज्यू या संगीत सोहळ्याला जमले होते. तेव्हा तेथे एक इस्रायली अरब पॅरामेडीक स्टाफही होता. त्याने तेथे अडकलेल्या लोकांचे प्राण वाचविणे महत्वाचे मानले आणि तेथून तो हलला नाही. अखेर हमास अतिरेक्यांच्या गोळीबारात तो ठार झाला. त्याच्या धैर्याला इस्रायल डिफेन्स फोर्सने ( IDF ) सलाम करीत आपला हिरो मानले आहे.
हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर शनिवारी 7 ऑक्टोबरला हल्ला केला तेव्हा तेथील सुपरनोव्हा म्युझिक कॉन्सर्टमध्ये रक्ताचा अक्षरश: सडा पाडला. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये एक एम्ब्युलन्स कर्मचारी म्हणून अवघ्या 23 वर्षांच्या अवद दारावेश हा अरब इस्रायल नागरिक ड्यूटीवर होता. त्याला इमर्जन्सीसाठी तैनात केले होते. तेवढ्यात तेथे हमासचा मोठा हल्ला झाला. म्युझिकच्या तालावर नाचणारे मौजमजा करणारे इस्रायली अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी होऊन मदतीसाठी किंचाळू लागले आणि वैद्यकीय कक्षाकडे धावू लागले. परंतू हमासच्या अतिरेक्यांनी गोळीबाराचा वर्षाव केल्याने सगळ्यांना ही जागा रिकामी करण्यास सांगण्यात आले. परंतू दारावशे याने तेथून हटण्यास नकार तेथेच जखमींच्या मदतीसाठी थांबण्याचा निर्णय घेतला. एका जखमीवर उपचार करताना त्याच्या गोळ्या घालण्यात आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अरबी येत असल्याने थांबला
काही दिवसांनी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर अन्य पॅरामेडीक्स स्टाफने दारावशे यांच्या कुटुंबियांना सांगितले की त्याने थांबण्याचा निर्णय का घेतला. वास्तविक त्याला वाटले आपण स्वत: एक अरबी असल्याने हमास आणि पॅरोमेडिक्स स्टेशनात अडकलेल्या लोकांमध्ये वाटाघाटी करु शकतो असे त्याला वाटले. रॉयटर्सशी बोलताना दारावेशच्या चुलत भावाने सांगितले की दारावेशने आपल्या साथीदारांना समजावले की आपल्याला अरबी बोलता येत असल्याने आपण परिस्थिती चांगली हाताळू शकतो, म्हणून वाचण्याची संधी असतानाही तो थांबला. त्याने आम्हाला खुप दु:ख दिलेय परंतू त्याचा आम्हाला अभिमानही आहे. त्याने शेवटच्या क्षणापर्यंत आपले कर्तव्य श्रेष्ठ मानेल आणि जखमींची सेवा करीत राहीला.
अंत्यसंस्काराला मोठी गर्दी
नाजरेथहून पाच किमीवर दक्षिण-पूर्वेत एक छोट्या अरबी बहुल गांव इक्सेलमध्ये शुक्रवारी दारावेश याच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी हजारो नागरिक जमले होते. इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी अरब अल्पसंख्यांक आहेत. दारावेशचे कुटुंबाच्या अनेक पिढ्या येथे राहिल्या. हे कुटुंब पॅलेस्टिनींचे वंशज असून 1948 मध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर झालेल्या युद्धानंतर या देशात राहीले आहे.