पाकिस्तानची पुन्हा फाळणी? बलूचिस्तान होणार स्वतंत्र, संयुक्त राष्ट्राकडून मिळणार मान्यता? तज्ज्ञ आणि पाकिस्तान नेत्यांचा दावा काय?
Baluchistan Independent Nation : पाकिस्तान जगातील सर्वात अपयशी राष्ट्र ठरलं आहे. केवळ भीकेवर गुजारण करण्याची वेळ या राष्ट्रावर आली आहे. त्यातच बलूची लोकांनी स्वातंत्र्याचा हुंकार पुन्हा भरल्याने लष्कारासह प्रशासनाची त्रेधात्रिपीट उडाली आहे.

पाकिस्तानची पुन्हा फाळणी होणार का? असा सवाल भारतात नाही तर पाकिस्तानच विचारल्या जात आहे. बांग्लादेश स्वतंत्र झाल्यापूर्वीच बलूची लोकांची स्वातंत्र्याची मागणी आहे. सिंध आणि पंजाब या प्रदेशाच्या सुपीक जमिनीवर या देशाची अर्थव्यवस्था काम करते आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या प्रांतात पण स्वातंत्र्याचे धुमारे फुटलेले आहेत. पण बलूच लिबरेशन आर्मीने गेल्या काही वर्षात जो निकाराचा लढा सुरू केला आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि प्रशासन जेरीस आल्याचे दिसते. पाकिस्तानच्या जुलूमशाहीला कंटाळून बांग्लादेश स्वतंत्र झाला. तिथे तख्तपलट करण्याचे आयएसआयचे स्वप्न पूर्ण झाले. पण देशातंर्गत सुरू असलेली बंडखोरी त्यांना थोपवता आलेली नाही. सध्या पाकिस्तानचे अनेक बडे अधिकारी आणि नेते बलूचिस्तान लवकरच स्वतंत्र होईल, असे जाहीरपणे सांगत आहेत.
स्वतंत्र राष्ट्रासाठी BLA आक्रमक
बलूच लोकांवर पाकिस्तानी लष्कराने, प्रशासनाने गेल्या 70 वर्षात अपरिमित अत्याचार केले. अनेक बलूच नेते, तरुणांना हाल हाल करून मारले. तिथल्या स्त्रियांवरील अत्याचाराला तर सीमा नाही. त्यातूनच बलूचिस्तान लिबरेशन आर्मीचा (BLA) जन्म झाला. या लढाऊ जमातीला अत्याधुनिक शस्त्र आणि दारुगोळा मिळाल्याने त्यांनी पाकिस्तानी अधिकारी, लष्करावरील हल्ले वाढवले आहेत. मंगळवारी BLA ने जफर एक्सप्रेस ही अख्खी ट्रेनच हायजॅक केली. यामध्ये प्रवाशी, आयएसआयचे अधिकारी, लष्कराचे जवान, अधिकारी यांचा समावेश होता. ही ट्रेन आणि ओलीस यांना सोडवण्यात पाक आर्मीला यश आले असले तरी त्यांचे मोठे नुकसान आणि नाचक्की झाली आहे.




बलूच राजकीय नेते, तरूण, कैदी आणि मानवी अधिकारासाठी लढणाऱ्या बलूच लोकांना लागलीच सोडण्यात यावे यासाठी बीएलएने हा हल्ला केला होता, याकडे अनेक माध्यमांनी दुर्लक्ष केले. बलूच लोकांना त्यांचा स्वतंत्र देश हवा आहे. सध्या पाकिस्तानमधील बलूचिस्तान आणि शेजारील इराण या देशातील दक्षिण-पूर्वेतील बलूच प्रदेश यांचा मिळून एक राष्ट्र करण्याची त्यांची जुनीच मागणी आहे.
लवकरच स्वातंत्र्याची घोषणा
बलूच हा अनेक वर्षांपासून स्वतंत्र प्रदेश होता. इंग्रजांच्या काळात सुद्धा करारानुसार या प्रदेशाला स्वातंत्र्य बहाल करण्यात आले होते. पण भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी टोळीवाल्यांनी आणि पाक लष्कराने या प्रदेशावर कब्जा मिळवला होता. भारत बलूच लोकांना मदत करण्याची भीती जिना यांना होती. त्यामुळे अगोदर हा प्रांत ताब्यात घेण्यात आला.
पाकिस्तानचा मोठा नेता मौलान फजलूर रहेमान याने सिनेटमध्ये दिलेल्या वक्तव्यानुसार, बलूचिस्तान आता स्वातंत्र्याच्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रदेशातील लोक केव्हा पण स्वातंत्र्याची घोषणा करतील. सध्या बंडखोरांच्या ताब्यात 7 जिल्हे आहेत. पाकिस्तानी प्रशासन आणि लष्काराचे या जिल्हांमध्ये कोणतेच नियंत्रण नाही. बलूचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली तर त्यांना संयुक्त राष्ट्र संघ सुद्धा लागलीच मान्यता देईल, असा दावा मौलानाने केला आहे. इतर ही अनेक पाकिस्तानी मुत्सद्दी मौलानाचीच री ओढत आहेत.
1876 पासून बलूचिस्तान स्वतंत्र
बलूचिस्तानसोबत इंग्रजांनी एक करार केला होता. 1876 मध्ये हा करार झाला होता. त्यानुसार, ब्रिटिश राजवटीपासून मुक्त स्वायत्तता या प्रदेशाला बहाल करण्यात आली होती. भारत-पाकिस्तान फाळणी वेळी, बलूची नेत्यांनी 5 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली. अखेरचा इंग्रज व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन याच्याशी चर्चेदरम्यान बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी स्वतंत्र राष्ट्राला मान्यतेचा कांगावा केला. पण अवघ्या सात आठ महिन्यातच पाकिस्तानी लष्कर आणि टोळीवाल्यांनी बलूचिस्तानवर कब्जा केला. तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रदेशातच अब्दाली सोबत बंदी म्हणून नेण्यात आलेले मराठा आहेत. त्यांचा धर्म, भाषा बदलली असली तरी अनेक चालीरिती महाराष्ट्राशी जुळतात. ते आजही त्यांच्या अडनावात अथवा नावा समोर मराठा हा शब्द आवर्जून लावतात.
ग्रेटर बलूचिस्तानमुळे इराणची वाढली चिंता
बलूच लोकांचा सर्वात मोठा बलूचिस्तान हा प्रदेश पाकिस्तानमध्ये आहे. तर दुसरा भाग हा इराणमध्ये आहे. त्याला बलूचिस्तानचा मुलगा म्हटले जाते. इराणमधील सिस्तान-बलूचिस्तान (Sistan and Baluchistan Province) या नावाने हा प्रदेश ओळखला जातो. हा प्रदेश इराणच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात आहे. तो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला लागून आहे. हा प्रदेश वाळवंट आणि डोंगरी आहे. याच भागात बलूच बंडखोर लपतात. त्यांचे प्रशिक्षण येथेच होते, असा पाकिस्तानचा आरोप आहे. विशेष म्हणजे या दोन्ही देशातील प्रदेशात जाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे बंडखोर थेट अफगाणिस्तानपर्यंत जाऊन येतात.
भारतासाठी हा भूभाग अगदी मोक्याचा
इराणमधील सिस्तान-बलूचिस्तान प्रांतात जोहेदान हे सर्वात मोठे शहर आहे. ती या भागाची राजधानी आहे. तर चाबहार हे सर्वात मोठे बंदर आहे. भूराजकीय दृट्या हे स्थान अत्यंत मोक्याचे आहे. सामरिक हालचालीसाठी बंदरच नाही तर हा प्रदेशा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या बंदराच्या विकासासाठी भारताने कोट्यवधी रुपये ओतले आहेत. या ठिकाणी इराण, अफगाणिस्तान आणि भारताचे व्यापारी, व्यापार आणि देवाण-घेवाण करतात.
पाकिस्तानमधील बलूच प्रांताची राजधानी क्वेटा हे शहर आहे. इराण आणि पाकिस्तानमधील बलूची लोकांमध्ये नातेसंबंध, देवाण-घेवाण होते. ते सांस्कृतिक, भाषिकदृष्ट्या एकत्र आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रदेशातील लोकांना वेगळे करण्याचे प्रयत्न इराण आणि पाकिस्तानला सुद्धा आजपर्यंत जमलेले नाही. या दोन्ही प्रदेशातील बलूच नागरिक ग्रेटर बलूचिस्तानची मागणी अनेक वर्षांपासून करत आहेत. आता तर क्वेटा जवळ झालेल्या नवीन हल्ल्यांनी पाकिस्तानी लष्कर सुद्धा हादरले आहे. तर तिकडे इराण सरकार सुद्धा गडबडून गेले आहे. पाकिस्तानसोबत या देशाच्या जिवाला घोर लागला आहे. पण सध्या बलूचिस्तान स्वतंत्र होण्याच्या चर्चा पाकिस्तानमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरल्या आहेत. त्याच शरीफ सरकारला मनस्ताप होत आहे.