फक्त आताच नव्हे तर याआधीही ‘त्या’ कठीण काळातही शेख हसिना यांनी भारतात आश्रय घेतला होता
Bangladesh Ex PM Sheikh Hasina in India : बांग्लादेशवर संकट आलं तेव्हा तेव्हा भारत मदतीला धावून गेला. आजही बांग्लादेशमध्ये गोंधळ निर्माण झालेला असताना शेख हसिना भारतात आल्या आहेत. पण संकटकाळात भारतात येण्याची त्यांची पहिलीच वेळ नाही, वाचा सविस्तर...
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांना ढाका शहर सोडत त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. आता त्या भारतातून पुढे लंडनला जाणार असल्याची माहिती आहे. आता बांग्लादेशबाबतचे निर्णय आता लष्करातील उच्चपदस्त अधिकारी घेणार आहे. आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ढाकातून हेलिकॉप्टरद्वारे शेख हसिना या त्रिपुरातील आगरताळामध्ये आल्या. पण तुम्हाला माहिती आहे का, कठीण काळात पहिल्यादांच शेख हसिना भारतात आल्या नाहीत. तर या आधीही कठीण काळात त्या भारतात आल्या होत्या.
नेमकं काय झालं होतं?
साल होतं, 1975… या साली शेख हसिना यांचे वडील आणि बांग्लादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाली. इतकंच नव्हे तर हसिना यांची आई वडील आणि तीन भावांची हत्या केली गेली. या हल्ल्यातून शेख हसिना, त्याचे पती वाजिदमियाँ आणि लहान बहिण वाचले होते. यावेळीही शेख हसिना यांनी भारतात आश्रय घेतला होता.
शेख हसिना काही काळासाठी जर्मनीत गेल्या. हसिना आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चांगले संबंध होते. इंदिरा यांनी हसिना यांना भारतात बोलावलं. त्या काही काळ भारतात राहिल्या आणि नंतर 1981 साली त्या बांग्लादेशमध्ये परतल्या. तिथे जात हसिना राजकारणात सक्रीय झाल्या. त्यांनी त्यांच्या पक्षाच अनेक बदल केले. पुढे शेख हसिना या चार वेळा बांग्लादेशच्या पंतप्रधान झाल्या आहेत. शेख हसिना यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. 1998 साली त्यांना मदर तेरेसा बाय ऑल इंडिया पीस काऊंसिलकडून पुरस्कार मिळाला होता. त्याच वर्षी हसिना यांना महात्मा गांधी पुरस्कारही प्राप्त झाला होता. 2000 ला द पर्ल बद पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
सध्या बांग्लादेशमध्ये नेमकं काय झालं?
बांग्लादेशमध्ये विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं. सरकारी नोकरीसाठी असलेल्या आरक्षणाला त्यांनी विरोध केला. त्यांनी केलेल्या आंदोलकनाचं रुपांतर आता हिंसाचारात झालं आहे. या आंदोलकांनी ढाका या बांग्लादेशच्या राजधानीच्या रस्त्यावर मोर्चा काढला आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानात प्रवेश केला. आता शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजिनामा दिला आहे.