Bangladesh : सीमवर्ती भागात पायाभूत सुविधा, तुर्कीकडून खरेदी केले किलर ड्रोन, भारताच्या सीमेजवळ वाढल्या बांगलादेश लष्कराच्या हालचाली
Bangladesh-India Tension : बांगलादेशात कट्टर पंथियांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून तख्तापलट केला. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात एक नामधारी सरकार तिथे गाडा हाकत आहे. पण या सरकारवर कट्टर पंथियांचे वर्चस्व आहे. हिंदूंवर अत्याचाराची मालिका सुरू असतानाच आता भारतीय सीमा रेषेवर पण हालचाली वाढल्या आहेत.
बांगलादेशात कट्टरपंथियांचा हैदोस सुरू आहे. हिंदूंवर अपरिमित अत्याचार सुरू आहेत. त्यांच्या दुकानं जाळण्यात येत आहेत. त्यांच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव वाढल्याचा दावा काही संघटना करत आहेत. विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन कट्टरपंथियांनी आता सत्तेत शिरकाव केला आहे. पाकिस्तान आणि चीनच्या मदतीने भारताविरोधात मोठं काही तरी घडवण्याचा कट रचल्या जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान आता सीमा रेषेवर सुद्धा बांगलादेशी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहे. सीमारेषेवर बांगलादेशाचे लष्कर पायाभूत सुविधा वाढवत असल्याने संशयाला बळकटी येत आहे. अर्थात या पायाभूत सुविधा वाढवण्यामागे काय कारणं आहेत याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
चिकन नेक परिसरात पायाभूत सुविधा
भारतीय सीमेजवळ बांगलादेशाचे सैन्य पायाभूत सुविधा वाढवत असल्याचे दिसते. उत्तर बंगालमधील चिकन नेकजवळील दोन ठिकाणी एअरस्ट्रिप तयार करण्यात येत आहे. या दोन्ही एअरस्ट्रीप या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तयार करण्यात आल्या होत्या. तेव्हा हा भूभाग भारताचा होता. ठाकूर गाव आणि लाल मनीर हाट या दोन्ही ठिकाणी बांगलादेशच्या लष्कराने पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत.
पाकिस्तानकडून कट्टरपंथियांना रसद
या घडामोडी घडत असताना बांगलादेशाने तुर्कीकडून 10 Bayraktar TB-2 किलर ड्रोन विकत घेतले आहे. त्यातील 6 ड्रोनची डिलिव्हरी चटगाव येथे देण्यात आली आहे. तर अजून 4 किलर ड्रोनची डिलिव्हरी अद्याप झालेली नाही. भारतीय गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर बांगलादेशात दहशतवाद्यांना तुरुंगातून बाहेर काढण्याचा सपाटा सुरू आहे. बांगलादेशातील कट्टरपंथी आता पाकिस्तानच्या बाजूने भारतविरोधी काम करण्याची योजना आखत आहेत. त्यासाठी पाकिस्तानकडून त्यांना रसद मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
सध्या तरी धोरणात्मक पातळीवर भारताला कोणताही धोका दिसत नसल्याचे गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे. पण जर बांगलादेशमध्ये युनूस सरकार अजून काही काळ राहीले तर ते जमात आणि दहशतवाद्यांच्या हाती जाईल आणि कट्टरतावाद्यांचा गड होईल. सध्या बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तिथे दहशतवादी आणि कट्टरतावादी सत्तेची सूत्र हाती घेण्यासाठी तयारी करत आहे. लवकरच त्यांच्याविरोधात कारवाई न केल्यास भारतासाठी ही धोक्याची मोठी घंटा असल्याचा दावा गुप्तहेर संस्थांनी केल्याचे समजते.