Bangladesh Crisis : सत्ता पालटण्यासाठी ज्यांनी केले आंदोलन, त्या विद्यार्थ्यांच्या गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ, मिळाले कोणते खाते
Bangladesh interim Government : नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार गुरुवारी बांगलादेशमध्ये सत्तेवर आले. युनूस यांनी प्रमुख सल्लागार म्हणून शपथ घेतली. सत्ता पालट करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी मदत केली, त्यांना अशी लॉटरी लागली.
बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार गुरुवारी सत्तेवर आले. युनूस यांनी शुक्रवारी विविधा खात्यांचे वाटप केले. त्यांनी स्वतःकडे 27 मंत्रालये ठेवली. साध्या पद्धतीने मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या मंत्रिमंडळात काही विद्यार्थी नेत्यांना लॉटरी लागली आहे. शेख हसीना यांचे सरकार घालवण्यापासून ते पुढील दिशा ठरवण्यापर्यंत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. या नेत्यांनी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात रान पेटवले होते. त्यांनी देशात मोठे आंदोलन उभे केले होते.
दोघांना दिले मंत्रीपद
बांगलादेशात अंतरिम सरकारने देशाची सूत्रं हाती घेतली. प्राध्यापक मोहम्मद युनूस नवनियुक्त 16 सदस्यांसह देशाचा गाडा हाकलणार आहेत. युनूस यांच्याकडे संरक्षण, प्रशासन, शिक्षण, ऊर्जासह एकूण 27 मंत्रालये आहेत. तर मोहम्मद तौहीद हुसैन यांच्याकडे परदेश मंत्रालय आहे. अंतरिम कॅबिनेटमध्ये दोन विद्यार्थी नेत्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये नाहिद इस्लाम याला दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान खाते देण्यात आले आहे. तर आसिफ महमूद याला क्रीडा मंत्रालय देण्यात आले आहे.
मोहम्मद युनूस हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे दीर्घकाळापासून टीकाकार राहिले आहेत. आरक्षणावरुन देश पेटल्यानंतर शेख हसीना यांना पळ काढावा लागला. त्या सध्या भारतात आश्रयाला आहेत. विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात कट्टरपंथीयांनी शिरकाव केल्यानंतर आगीच्या अनेक घटना घडल्या. अल्पसंख्यांक विशेषतः हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. तर काही भागात विद्यार्थ्यांनी कट्टरपंथीयांना विरोध केला. मशिदीमधून हिंदूंवर हल्ले न करण्याचे आवाहन करण्यात आले. एकंदरीत गेल्या दोन महिन्यांपासून धुमसत असलेल्या या शेजारी देशामुळे सीमेवर तणाव वाढला आहे.
अप्रत्यक्ष लष्कराची सत्ता
मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार जरी सत्तेत आले असले तरी अप्रत्यक्षरित्या सत्ता लष्काराच्याच हातात असल्याची चर्चा आहे. लष्करातील सेवानिवृत्त ब्रिगेडिअर जनरल एम सखावत हुसैन यांच्याकडे गृह मंत्रालय देण्यात आले आहे. आता देशात शांतता स्थापन करण्याचे पहिले कर्तव्य असल्याचे परदेश मंत्र्यांनी सांगितले. तर सर्व देशांशी बांगलादेश चांगले संबंध स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले.