बिजींग : चीन सरकारने अलीबाबा ग्रुपच्या अडचणीत वाढ केलीय. अलीबाबा ग्रुप एकाधिकारशाही (मोनोपॉली) करुन आपल्या अधिकारांचा गैरउपयोग करत असल्याचा सरकारला संशय आहे. या प्रकरणी चीन सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आगामी काळात अलीबाबा ग्रुपचा प्रमुख जॅक-माची कंपनी कंपनी अँट ग्रुपला (Ant Group) देखील नोटीस पाठवण्यात येणार आहे. ही कारवाई जॅक-माची ई कॉमर्स कंपनी आणि फिनटेक एम्पायरसाठी मोठा झटका मानलं जात आहे (China government order to probe into Jack Ma Alibaba for monopoli Ant Group IPO).
विशेष म्हणजे मागील महिन्यात चीन सरकारने नाट्यमयरित्या जॅक यांच्या Ant Group चे 37 अरब डॉलरचे ‘इनिशियल पब्लिक ऑफरींग’ (IPO) रद्द केले होते. जॅक-माच्या या कंपनीच्या IPO ला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. हा जगातील सर्वात मोठा IPO होता. मात्र, शांघाय आणि हाँगकाँगच्या मार्केटमध्ये शेअर्सच्या यादीत केवळ 2 दिवस आधीच चीन सरकारने या IPO वर बंदी घातली.
चौकशीच्या आदेशानंतर हाँगकाँग बाजारात अलीबाबाच्या शेअर्सची 6 टक्के पडझड झाली. चीन सरकारने याआधी देखील ई-कॉमर्समधील दिग्गज कंपनी असलेल्या अलीबाबाला दोनपैकी एक गोष्ट स्वीकारण्यास सांगत इशारा दिला होता. अलीबाबा कंपनीकडून छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांशी इतर कुणाशीही व्यापार न करण्याचा करार केला जात असल्याचाही आरोप आहे. यामागे प्रतिस्पर्धी कंपन्यांचा माल विकला जाऊ नये अशी रणनीती होती. म्हणजेच जे व्यापारी अलीबाबासोबत व्यवसाय करत होते ते इतर कुणाशीही व्यवसाय करु शकत नाही.
स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन फॉर मार्केट रेग्युलेशनचे (SAMR) अलीबाबाच्या कराराची चौकशी करण्याचे आदेश
पीपल्स बँक ऑफ चायनाने गुरुवारी (24 डिसेंबर) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये आर्थिक नियंत्रण संस्था अलीबाबाच्या Ant Group fintech ची चौकशी करतील. Ant Group ला संबंधित सरकारी संस्थेकडून नोटीसही मिळाली असून अलीबाबा ग्रुपकडून लवकरच अटींची पुर्तता केली जाईल, अशी माहिती मिळते आहे. असं असलं तरी अलीबाबा ग्रुपकडून अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चीनमधील सरकारी माध्यमांनी देखील सरकारच्या या कारवाईच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय.
हेही वाचा :
चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी: देवेंद्र फडणवीस
जनरल मोटर्स भारतातील शेवटचा प्लांट बंद करुन चीनला 2000 कोटींना विकणार, कारण काय?
ऑस्ट्रेलियासोबतच्या व्यापारी वादांमुळे चीनच्या समुद्रकिनाऱ्यावर भारतीय जहाजे अडकली
China government order to probe into Jack Ma Alibaba for monopoli Ant Group IPO