China Protest: चीनमध्ये कोरा कागद दाखवून लोकं कशाचा विरोध करत आहेत? चिनी सरकारलाही फुटला घाम!
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चीनच्या अनेक शहरामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. स्थानिकांचे आंदोलन जगाचे लक्ष वेधून घेत आहे.
बीजिंग, चीनमध्ये (Protest In China) देशांतर्गत हलह वाढत चालला आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे लॉकडाऊन लावला आहे. रविवारी चीनमध्ये कोविडची सुमारे 40 हजार नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. या लोकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे जीवन प्रभावित झाले असून सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिकांनी प्रदर्शने सुरु केली आहेत. चीन सरकारच्या शून्य कोविड धोरणामुळे, अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला. लॉकडाउनच्या विरोधात लोकं रस्त्यावर उतरले आहेत आणि कठोर निर्बंधांचा निषेध करत आहेत. आंदोलक राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात घोषणा देत होते. त्यांनी “चिनफिग डेथ्रोन”, “कम्युनिस्ट पार्टी डिथ्रोन” आणि “अनलॉक चायना” अशा घोषणा दिल्या.
सरकारविरोधात पहिल्यांदाच मोठे आंदोलन
कोविड निर्बंधांविरुद्धचा हा निषेध बीजिंग आणि नानजिंगमधील विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये पोहोचला आहे. शांघायमधील निषेधाचा व्हिडीओ इंटरनेट पाहायला मिळत आहे. सरकारच्या कडक धोरणाविरोधात लोकं उघडपणे शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात घोषणा देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आंदोलक हातात कोरा कागद दाखवून सरकारचा निषेध करीत आहेत. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा जगभरात होत आहे.
हा सलग चौथा दिवस आहे जेव्हा कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी रात्री हजारो आंदोलक शांघायमधील वुलुमुकी रोडवर जमले होते, परंतु रविवारी पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही निदर्शने सुरूच होती. याठिकाणी शेकडो लोक आणि पोलिसांमध्ये चकमकही झाली.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये, शांघायमधील आंदोलकांना अटक करताना आणि संतप्त लोक त्यांच्या अटकेचा निषेध करताना दिसत आहेत. बीजिंग, वुहान आणि चेंगडू शहरातही निदर्शने झाली.