पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन, इंटरनेट ठप्प.. दाऊद इब्राहिमशी कनेक्शन काय ?
संपूर्ण पाकिस्तानात इंटरनेट बंद आहे. लोकं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही वापर करू शकत नाहीयेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या व्हर्च्युअल रॅलीपूर्वीच संपूर्ण देशातील इंटरनेट बंद झाले. इंटरनेट ट्रॅकिंग एजन्सीजच्या सांगण्यानुसार, संपूर्ण पाकिस्तानात एक्स (पूर्वीचे ट्विटर) फेसबूक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसह अन्य सोशल मीडिय प्लॅटफॉर्म्स हाताळताना त्रास होत आहे.
नवी दिल्ली | 18 डिसेंबर 2023 : मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याबाबत सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. दाऊद याच्यावर विषप्रयोग झाल्याने त्याच्यावर कराचीमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान संपूर्ण पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सही डाऊन असल्याने युजर्स त्रस्त झाले आहेत. सरकारशी निगडीत सूत्रांच्या सांगण्यानुसार, रविवारी रात्री माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान-ए-इन्साफ ( PTI) चे अध्यक्ष इम्रान खान यांची व्हर्च्युअल रॅली होती. मात्र त्यामुळे वातावरण बिघडून परिस्थिती चिघळू नये यासाठी रॅलीपूर्वीच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. मात्र काही जण यांचा संदर्भ दाऊद इब्राहिमशी जोडत आहेत.
रविवारपासून सोशल मीडियावर दाऊद इब्राहिमशी निगडीत, त्याच्या प्रकृतीसंदर्भात अनेक अफवा वेगाने पसरत आहेत. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने इंटरनेट ठप्प करण्यात आले आहे. मात्र याला कोणाताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सध्यातरी,संपूर्ण पाकिस्तानातील युजर्सना सोशल मीडिया वापरताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. रविवारी रात्री 9 च्या सुमारास इम्रान खान यांची व्हर्च्युअल रॅली सुरू होणार होती, मात्र इंटरनेट स्लोडाऊन मुळे रॅलीचे स्ट्रीमिंग करताना बराच त्रास झाला.
दूरसंचार विभागाचे मौन
डॉन या पाकिस्तानमधील वृत्तपत्रानुसार, रविवारी रात्री 8 नंतर लाहोर, कराची आणि इस्लामाबादमध्ये इंटरनेट वापरण्यात अडचण येत असल्याचे युजर्सनी सांगितले. तसेच काही ठिकाणी इंटरनेट स्लो असल्याची तक्रारही युजर्सनी नोंदवली. खौबर पख्तूनख्वाचे माजी वित्तमंत्री आणि पीटीआय नेते तैमूर झागरा यांनीबी ऑनलाइन रॅलीदरम्यान इंटरनेटसंदर्भात प्रश्न उपस्थत केले. मात्र हे पाऊल अपेक्षित असल्याचे पीटीआयने म्हटले. पण पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणातर्फे यासंदर्भात कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. अधिकाऱ्यांनी या विषयावर अद्याप मौन बाळगले आहे.
मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद
1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला दाऊद अनेक वर्षांपासून कराचीमध्ये राहत आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. 1993 मध्ये झालेल्या मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 250 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच हजारो नागरिक जखमी झाले. दाऊद इब्राहीम विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. परंतु पाकिस्तान दाऊद याचा ताबा भारताकडे देण्यास तयार नव्हता. आता त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने विषप्रयोग केल्याची माहिती सोशल मीडियातून समोर आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस दाऊद इब्राहीमच्या जवळच्या नातेवाईकांकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.