नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : भारताचा सर्वात मोठा दुश्मन, 93 च्या बॉम्बस्फोटातील शेकडो लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेला.. मोस्ट वाँटेड गुन्हेगार.. दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) ! रविवार रात्रीपासून फक्त भारतातच नव्हे तर जगभरात या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याला कारणही तसंच होतं. अंडरवर्ल्डच्या या कुख्यात डॉनवर विषप्रयोग झाल्याची आणि तो रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती खालावल्याचे वृत्त रविवारी रात्री पसरले आणि एकच खळबळ माजली. दाऊदबद्दलची कुठलीही बातमी बाहेर जाऊ नये म्हणून तिथे गूगल सर्विसेज, ट्विटर एकूणच सोशल मीडिया डाऊन करण्यात आलं. इंटरनेटही ठप्प झालं. पाकिस्तानी पत्रकार आरजू कासमीने दाऊदची तब्येत गंभीर असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून जगभरात याच विषयावर चर्चा सुरू होती.
पण आता दाऊदचा अगदी जुना, खास आणि विश्वासू सहकारी छोटा शकील याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत छोटा शकीलने दाऊदच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावत ‘भाई (दाऊद) 1000 टक्के फिट आहे’ असा दावा केला. दाऊदच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा, सर्व वृत्त निराधार असल्याचा पुनरुच्चार शकीलने केला. ‘दाऊदला विषबाधा झालेल नाही, ना त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो एक हजार टक्के ठणठणीत आणि फिट आहे. त्याच्याबद्दल येणाऱ्या बातम्या या निराधार आहेत’ असे छोटा शकीलने सांगितले.
इंटरनेटवरील बातम्या निराधार
पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा ‘जावई’ असलेल्या दाऊदचा पाकिस्तानात विषबाधेने मृत्यू झाल्याची बातमी सोमवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत होती. तसेच पाकिस्तानात इंटरनेट ठप्प झाले, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सही डाऊन होते. दाऊद संदर्भातील बातमीने एकच खळबळ माजली. मात्र छोटा शकील याने हे सर्व वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनाबी हे वृत्त फेटाळलं आहे. दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याचं समाजमाध्यमांवर प्रसारित झालेलं वृत्त ही केवळ अफवा आहे, असं पोलिसांनी सांगितलं. याबाबत चौकशी केली तेव्हा त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं निष्पन्न झाल्याचंही पोलिसांनी नमूद केलं.
दाऊदचा सर्वात जवळचा सहकारी छोटा शकील
अतिशय चुकीच्या उद्देशाने डॉनच्या मृत्यूसंदर्भातील बातम्या कधीही पसरवल्या जातात. छोटा शकील हा दाऊदचा डावा हात मानला जातो. तो दाऊदच्या कारभारातील ग्लोबल ऑपरेशन्स सांभाळतो. माझी ‘भाई’शी भेट झाली आणि ते अगदी फिट आहेत, याचा पुनरुच्चार छोटा शकीलने केला.
तर छोटा शकील घरात बसला असता का ?
दरम्यान, पोलिसांनीही दाऊदच्या बाबतीतील सर्व बातम्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जर दाऊदला काही झालं असतं तर छोटा शकील त्याच्या घरात बसला नसता. दाऊदवर विषप्रयोग झाला नसल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. गेल्या आठवड्यात दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील रुग्णालयात वैद्याकीय तपासणीसाठी गेला होता. मात्र आता तो घरीच असल्याचं पडताळणीत निष्पन्न झालं आहे.
दाऊदवर विषप्रयोग झाल्याची बातमी कुठून आली ?
दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या रविवारपासूनच समोर समोर येऊ लागल्या. पाकिस्तानी पत्रकार आरजू काजमी हिने तिच्या यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी दाऊदबाबतची बातमी दिली. दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा दावा ‘भेजा फ्राय’ या शोमध्ये आरजू यांनी केला.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर दाऊद आहे. बऱ्याच काळापासून तो पाकिस्तानमध्ये ठाण मांडून बसल्याचे माहीत असून तो आत्तापर्यंत पकडला गेलेला नाही. भारताने त्याच्या विरोधात शेकडो पुरावे देऊनही पाकिस्तानने दाऊद त्यांच्या भूमीत असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला, त्यांनी वारंवार हे दावे फेटाळले.