नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : कतारने भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावल्याने भारतीय नागरिकांना धक्का बसला आहे. भारतीय परराष्ट्र विभाग या प्रकरणात सर्व पर्याय वापरुन या भारतीयांना अडचणीतून सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कतारमध्ये आठ लाख भारतीय रहात आहेत. या मुस्लीम देशाशी भारताचे चांगले व्यापारी संबंध राहीले आहेत. तरी मधल्या अनेक घटना आणि सध्या सुरु असलेल्या इस्रायल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलला हेरगिरीत मदत केल्याच्या आरोपावरुन भारतीय नागरिकांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा कतारच्या कोर्टाने सुनावल्याने या दोन्ही देशांच्या नात्यात पुन्हा मिठाचा खडा आला असल्याचे म्हटले जात आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये साल 2016 च्या 4 आणि 5 जून रोजी त्यांनी कतारला दोन दिवसाची भेट दिली होती. कतारचे सर्वेसर्वा अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्या निमंत्रणावरून मोदी कतारच्या भेटीवर गेले होते. 21 जून 2015 रोजी आयोजित प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवसाला पाठिंबा दिल्याने त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे आभार मानले होते.
भारताने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केल्याबद्दल भारतात मु्स्लीम समुदायाच्या काही लोकांनी विरोध केला होता. अशावेळी कतारने भारताच्या भूमिकेला पाठिंबा देत योग दिनानिमित्त पोस्टाचे तिकीट जारी केले होते. भारताचे कतारशी संबंधाचे कडू-गोड अनुभव आले आहेत.
भारतीय नौदलाच्या 8 माजी कर्मचाऱ्यांवर कतारने हेरगिरीचे गंभीर आरोप ठेवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने पुन्हा भारत आणि कतारचे संबंधात पुन्हा मिठाचा खडा पडला आहे. यासंदर्भात नेमके काय आरोप याचा खुलासा दोन्ही देशांनी केलेला नाही. या प्रकरणातील अधिकारी पाणबुडीच्या प्रकल्पावर काम करीत होते. त्यांनी पाणबुडीची माहीती इस्रायलला पुरविल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पुन्हा दोन्ही देशाचे संबंध बिघडले आहेत. असे पहिल्यांदा घडलेले नाही यापूर्वी दोन्ही देशाचे संबंध बिघडले आहेत. यापूर्वी भाजपाच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे मोहम्मद पैंगबराबद्दल कथित वादग्रस्त वक्तव्य, इस्लामिक अध्यात्मिक गुरु झाकीर नाईक, प्रसिद्ध चित्रकार मकबुल फिदा हुसेन यांच्यामुळे देखील संबंध बिघडले आहेत.
साल 2022 मध्ये फिफा वर्ल्डकपचा फिव्हर जगभर होता तेव्हा कतार येथे या खेळाच्या दरम्यान झाकीर नाईक यांच्या एण्ट्रीने खळबळ उडाली होती. भारताने आरोपी म्हणून घोषीत केलेल्या झाकीर नाईक यांना कतारने आवतन दिल्याने भारत संतापला होता. या प्रकरणात नाईक यांना वर्ल्ड कपच्या उद्धाटन सोहळ्याला अधिकृतरित्या बोलावले नसल्याचा दावा कतारने नंतर केला होता. झाकीर नाईक यांना भारतीय तपास यंत्रणा ईडी आणि एनआयएने वॉण्डेट घोषीत केले आहे. साल 2017 मध्ये झाकीर नाईक मलेशियात पसार झाले आहेत.