मोदींनी वडिलांप्रमाणे सर्वांना सोबत घेतलं, ते भारताचे राष्ट्रपिता : डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (American President Donald Trump) यांनी पंतप्रधान मोदींना थेट भारताचे राष्ट्रपिताच (Father of India) म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रपिता या संबोधनावरुन जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (American President Donald Trump) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील मैत्रीपूर्ण (Trump Modi Friendship) नातं सध्या चर्चेचा विषय आहे. ट्रम्प यांनी अनेक विषयांवर मोदींचं कौतुक केल्याचंही अनेकदा पाहायला मिळालं. आता तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना थेट भारताचे राष्ट्रपिताच (Father of India) म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रपिता या संबोधनावरुन जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मोदी हे महान नेता आहेत. मला अगोदरचाही भारत आठवतो. तिथे मोठा विरोध आणि संघर्ष होता. मात्र मोदींनी सर्वांना सोबत घेतलं आणि ते पुढे आले. वडील असंच सर्वांना सोबत घेऊन चालतात. त्यामुळे ते भारताचे राष्ट्रपिता आहेत. आम्ही त्यांना राष्ट्रपिताच म्हणू.”
US President: He (PM Modi) is a great gentleman & a great leader. I remember India before was very torn. There was a lot of dissention,fighting & he brought it all together. Like a father would bring it together. Maybe he is the Father of India. We’ll call him the Father of India pic.twitter.com/YhDM3imoxl
— ANI (@ANI) September 24, 2019
याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील पंतप्रधान मोदींना भारताचे राष्ट्रपिता म्हटले होते. मात्र, त्यावेळी त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्या होत्या. आता ट्रम्प यांनीही मोदींना राष्ट्रपिता संबोधल्याने पुन्हा एकदा यावर चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
महात्मा गांधींना त्यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अतुलनीय कामासाठी दिलेली राष्ट्रपिता ही उपाधी इतर कुणाहीसाठी वापरण्यास अनेकांचा विरोध आहे. त्यामुळेच अमृता फडणवीसांनी मोदींना राष्ट्रपिता म्हटल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता ट्रम्प यांच्या या संबोधनानंतर काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.