Donald Trump : अमेरिकेच्या या राष्ट्राध्यक्षांवर देखील झाला होता जीवघेणा हल्ला, जागतिक महाशक्तीचा रक्तरंजित इतिहास
लोकशाही राष्ट्र आणि जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना धक्कादायक असली तरी याआधी देखील आजी, माजी राष्ट्राध्यक्ष आणि या पदाच्या शर्यतीतील उमेदवारांना लक्ष्य केल्याच्या अनेक काळ्या घटनांनी महासत्ता असलेल्या अमेरिकेचा इतिहास काळवंडला आहे... त्याचा हा आढावा....
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी गोळीवार झाल्याने खळबळ उडाली आहे. पेन्सिव्हीनियाच्या बटलर येथील एका निवडणूक रॅलीत भाषण करीत असताना त्यांच्यावर घात लावून बसलेल्या एका स्नायपरने दूरुन गोळी झाडली. ती गोळी त्यांच्या कानाला चाटून गेल्याने ते जखमी झाले असले तरी थोडक्यात बचावले. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेत राजकीय संघर्षातून कोणीही असा हल्ला करणार नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता अमेरिकेतील राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. अमेरिकेत एखाद्या माजी किंवा आजी राष्ट्राध्यक्षांवर हल्ला होण्याचे हे पहिलेच प्रकरण नसून यापूर्वी देखील असे हल्ले झाले आहेत. कसा आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचा रक्तरंजित इतिहास पाहूयात…
जॉर्ज वॉलेस यांना कायमचे अपंगत्व
15 मे 1972 रोजी राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार आणि अलबामाचे गव्हर्नर जॉर्ज वॉलेस यांच्यावर आर्थर ब्रेमर नावाच्या व्यक्तीने गोळ्या होत्या.त्यामुळे जॉर्ज वॉलेस वाचले खरे परंतू त्यांना आयुष्यभराचे अंपगत्व आले. जॉर्ज वॉलेस हे अलाबामाच्या गव्हर्नर पदावर दुसऱ्या टर्ममध्ये होते. 1972 च्या डेमोक्रॅटिक प्रायमरीपूर्वी राष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी तिसरी टर्म जाहीर केली होती. 15 मे 1972 रोजी मेरीलँड शॉपिंग सेंटरमध्ये एका कार्यक्रमात आर्थर ब्रेमर यांने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा त्यांच्या अध्यक्ष पदाचे स्वप्न धुळीस मिळाले. वॉलेस यांचे प्राण वाचले असले तरी कंबरेपासून अर्धांगवायू झाल्याने पुढील आयुष्यभर त्यांना अपंगत्व आले. आरोपी ब्रेमर याला अटक होऊन 63 वर्षांची शिक्षा झाली.
एंड्यू जक्सन यांच्यावर हल्ला
30 जोनवारी 1835 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष एंड्यू जॅक्सन यांच्यावर हल्लेखोराने पिस्तूल ताणले होते. परंतू मिस फायर झाली. त्यानंतरही त्याने आपल्याकडील दुसऱ्या पिस्तूलातूनही त्यांच्यावर गोळीबार केला होता. परंतू हा बारही वाया गेल्याने अखेर त्याने पिस्तुलाच्या मागच्या दस्त्याने त्यांच्यावर हल्ला केला.
अब्राहम लिंकन यांची हत्या
अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यावर 1865 मध्ये जवीघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ते एका नाट्यगृहात नाटक पाहात असताना त्यांच्या डोक्यात हल्लेखोराने गोळ्या घातल्या. त्यांच्या हत्येच्या नऊ महिन्यांआधी देखील अब्राहम लिंकन यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी गोळी त्यांच्या टोपीतून आरपार गेली आणि ते वाचले होते. परंतू दुसऱ्या हल्ल्यात ते ठार झाले.
ट्रेन पकडताना गोळ्या घातल्या
अमेरिकेचे 20 वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गार्फील्ड यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर चार महिन्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तर अमेरिकेचे 25 वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्ले यांची देखील गोळी घालून हत्या झाली होती. ते देखील भाषण करीत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.
रॉबर्ट कॅनेडी यांची हत्या
16 मार्च 1968 रोजी रॉबर्ट कॅनेडी यांनी डेमोक्रेटिक राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात व्हीएतनाम युद्धातील अमेरिकन सैन्याची हानी आणि जनतेतील असंतोष मांडला होता. त्यांनी इंडियाना आणि नेब्रास्कामध्ये निवडणूकांची प्राथमिक फेरी जिंकली. त्यानंतर संपूर्ण देशातील उत्साही झालेल्या मतदारांसमोर भाषण करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. रॉबर्ट फ्रांसिस कॅनेडी यांनी 5 जून, 1968 रोजी लॉस एंजिल्स आणि कॅलिफोर्निया येथील एंबेसडर होटलात त्या राज्यातील महत्वाची डेमोक्रेटिक प्राथमिक फेरी जिंकल्याचा दावा केल्यानंतर लगेचच त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. तेव्हा ते केवळ 42 वर्षांचे होते. परंतू त्यांचे आयुष्य छोटे ठरले. रॉबर्ट कॅनेडी यांची दूरदृष्टी आणि जीवन आदर्श आज देखील वाशिंगटन, डीसीमध्ये रॉबर्ट एफ. कॅनेडी मेमोरियल ट्रस्ट आणि स्मारकाच्या माध्यमातून जतन केलेला आहे.
जॉन एफ केनेडी यांची गूढ हत्या
साल 1963 मध्ये अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची देखील हत्या झाली होती. अमेरिकेच्या इतिहासात जॉन एफ. केनेडी कधीच निवडणूक हरले नव्हते. तसेच अमेरिकेचे दुसरे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी ते अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष बनले होते. 22 नोव्हेंबर 1963 रोजी डॅलस, टेक्सास येथे खुल्या कारमधून प्रवास करत असताना त्यांची हत्या करण्यात झाली. त्याच्यावर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोर ओसवाल्डला पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेच्या दोन दिवसांनंतर, केनेडी समर्थकाने आरोपी ओस्वाल्डची हत्या केली. या घटनेने अवघ्या जगाला धक्का बसला. त्यांच्या हत्येचे खरे कारण कोणालाही समजू शकले नाही.
अभिनेत्री इम्प्रेस करण्यासाठी गोळ्या घातल्या….
साल 1981 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्यावर देखील जीवघेणा हल्ला झाला होता. ते एका समारंभात चाहत्यांच्या गर्दीत उभे असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला . अचानक एका व्यक्तीने त्यांना गोळी घातली. जॉन हिंक्ले याने हा हल्ला केला होता. या आरोपीने आपण प्रसिद्ध अभिनेत्री जोडी फोस्टर हीला इम्प्रेस करण्यासाठी हा हल्ला केल्याचे म्हटले होते. अमेरिकन नेते रूझवेल्ट आणि गेराल्ड फोर्ड यांच्या सुद्धा हत्येचा प्रयत्न झाला होता. मात्र ते दोघेही सुदैवाने बचावले.