Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये ज्या शाळेत सर्वसामान्यांनी आसरा घेतला, तिच शाळा केली उद्ध्वस्त; 60 जण जळून खाक
पूर्व युक्रेनमधील एका शाळेवर रविवारी बॉम्ब हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे या स्फोटात 60 जणांचा मृत्यू झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
कीवःगेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War) सुरूच आहे. युक्रेनमध्ये प्रचंड नुकसान होऊनही रशियाकडून युक्रेनवर अजूनही हल्ले (Bombspot) सुरुच ठेवण्यात आले आहेत. युक्रेनमधील पूर्वेकडील भागात या दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये प्रचंड युद्ध सुरू आहे. युद्धाचे केंद्र बनलेल्या पूर्व युक्रेनमधील एका शाळेवर रविवारी बॉम्बहल्ला करण्यात आला. या बॉम्बस्फोटात 60 जणांचा मृत्यू (60 killed) झाला असून अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
शाळेवर बॉम्ब हल्ला
राज्यपालांकडून या बॉम्बस्फोटात 60 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेने सांगितले आहे. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनच्या लुहान्स्क भागातील बिलोहोरिव्कातील शाळेवर बॉम्ब हल्ला केला आहे. रशियाने केलेल्या या भीषण हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू झाला असून कित्येक जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
सर्वसामान्यांना आसरा शाळांचा
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लुहान्स्कचे गव्हर्नर सेर्ही गैडाई यांनी रशियन हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, रशियन सैन्यांकडून आता शाळा लक्ष्य करण्यात आल्या आहेत. कारण रशियन सैन्यांकडून सतत हल्ला होत असल्याने शाळांमधून सर्वसामान्य नागरिक आसरा घेत आहेत. त्यामुळे शाळांवर हल्ले केले जात आहेत.
रशियन सैन्यांकडून बॉम्बचा मारा
लुहान्स्कच्या गव्हर्नरनी सांगितले आहे की, रशियन सैन्यांकडून ज्यावेळी बॉम्बचा मारा करण्यात आला त्यावेळी झालेल्या बॉम्ब स्फोटात शाळेला आग लागली, ती आग इतकी भीषण होती की, चार ते पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
ओडेसावर सहा क्रूझ क्षेपणास्त्रे डागली
युक्रेनच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने राजधानी कीव तसेच खारकीव आणि ओडेशा येथे बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. रशियन सैन्याकडून ओडेसावर सहा क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे तीन पूल उद्ध्वस्त झाले असून होत असलेला संपर्कही आता तुटण्यात आला आहे. रशियन हल्ल्यात अनेक इमारतींचेही नुकसान झाले. मिकोलेव्हमध्येही स्फोटांचे सतत आवाज ऐकू येत असून आले ओडिशातही एअर अलर्ट सायरन सतत वाजत आहेत.