अॅडिस अबाबा: इथिओपिया येथून केनियाला जाणारं इथियोपियन एयरलाइन्सचं बोईंग-737 विमान कोसळलं. इथिओपियाची राजधानी अॅडिस अबाबा येथे रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. हे विमान इथिओपिया येथून केनियाची राजधानी नैरोबीला जात होत. या विमानात एकूण 157 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 149 प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स होते.
बोईंग 737-800 या विमानाने अॅडिस अबाबा येथून आज सकाळी 8.38 वाजता नैरोबीकरिता उड्डाण केले. बोले आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण करताच कंटोल रुमशी त्यांचा संपर्क तुटला. त्यानंतर अॅडिस अबाबाच्या दक्षिण पूर्व भागात हे विमान कोसळल्याची शक्यता असल्याची माहिती इथियोपियन एयरलाइन्सने दिली. या विमानात 149 प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स होते. या अपघाताची माहिती मिळताच शोध कार्याला सुरुवात करण्यात आली. मात्र, अद्याप कुणीही जिवंत असल्याची माहिती मिळालेली नाही, असे इथियोपियन एयरलाइन्सने स्पष्ट केले.
इथियोपियन एयरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात येईल, तेथे तात्काळ सेवा पुरवण्यात येईल. या विमानात प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना माहिती पुरवण्यासाठी माहिती केंद्र सुरु करण्यात येईल, असेही इथियोपियन एयरलाइन्सने सांगितले. तर, इथियोपियाच्या सरकारने या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.