6000000000000 रुपये स्पेसवर खर्च करणारा अमेरिका सुनीता विल्यम्सचा जीव वाचवू शकत नाही? कारण वाचून हैराण व्हाल
अमेरिकेची शेवटची मानव चंद्र मोहीम अपोलो 17 होती, जी 7 डिसेंबर 1972 रोजी सुरू झाली आणि 19 डिसेंबर 1972 रोजी संपली. या घटनेस पन्नास वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यानंतर अमेरिकेला या मोहीमांसाठी होणाऱ्या प्रचंड खर्चावर नियंत्रण आणले आहे.
भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशनमध्ये जून महिन्यापासून अडकले आहेत. ते 5 जूनला बोईंग स्टारलायनर कंपनीच्या अंतराळ यानातून अंतराळ स्थानकात गेले होते. आता हे यान क्रु मेंबर शिवाय परतणार आहे. हे मिशन केवळ आठवडाभराचे होते परंतू स्टारलायनरच्या तांत्रिक बिघाडाने हे मिशन रखडले आहे. आता आठ दिवसांचे हे मिशन आठ महिन्यांचे झाले आहे. या काळात या अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहावे लागणार आहे. जागतिक सुपर पॉवर म्हटली जाणारी आणि अंतराळ संशोधनावर प्रचंड पैसा खर्च करणारी अमेरिका या आपल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यास काय फेल ठरली हे तज्ज्ञांकडून समजून घेऊया…..
बोईंग कंपनीच्या स्टारलायनर स्पेशशिप सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघा अंतराळवीरांना घेऊन 5 जून रोजी अवकाशात झेपावले. त्यांना केवळ आठ दिवस मुक्काम करुन परतायचे होते. परंतू त्यांच्या यानातून हेलियम लीक झाल्याने आणि थ्रस्टर काम करीत नसल्याने त्यांचे पृथ्वीवर येणे वारंवार पुढे ढकलले गेले. आता त्यांना अंतराळात किमान 240 दिवस काढावे लागणार आहेत. म्हणजे पुढच्या वर्षी फेब्रुवारीत ते पृथ्वीवर परतणार आहेत. या दोघांच्या पृथ्वी वापसीचा कार्यक्रम अजूनही निश्चित नसल्याचे समोर आले आहे. कारण नासाने तारीख आणि वेळ जाहीरच केलेली नाही. इतक्या मोठ्या मुक्कामाचा त्यांच्या शरीरावर काही दुष्प्रभाव होऊ शकतो का? त्यांचे वय वाढणार की तसेच राहणार ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतू अमेरिकेच्या अंतराळ संशोधनावरील खर्च एखाद्या देशाच्या जीडीपी पेक्षा जास्त आहे. मग आपल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी अमेरिका का मागे पुढे पहात आहे असाही प्रश्न आहे.
14 वर्षांची मेहनत आणि 400 कोटी डॉलरच्या प्रकल्पाचा कचरा
गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आता स्पेसएक्स कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टने फेब्रुवारी महिन्यात पृथ्वीवर परतणार आहेत. सप्टेंबर अखेरीस हे यान अंतराळात उड्डाण घेणार आहे. या एवढ्या गॅपमुळे स्पेसएक्सला पुढील लॉंचिंगची तयारी करायला पुरेसा वेळ मिळणार आहे. आधी या यानातून चार क्रु मेंबर अंतराळात जाणार होते. आता दोनच क्रु मेंबर अंतराळात जातील, म्हणजे दोन सीट सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी रिझर्व्ह राहतील असे म्हटले जात आहे. फेब्रुवारीत हे दोन अंतराळवीर या स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर घरवापसी करतील अशी योजना आहे. दुसरीकडे बोईंग कंपनीचा 14 वर्षांच्या 400 कोटी डॉलरचा प्रकल्प अवकाश मोहीमेत पांढरा हत्ती ठरुन बरबाद झाला असून अमेरिकेचे पैसे बुडाले आहेत.