नवी दिल्ली : ‘एक मच्छर साला, आदमी को..’ नाना पाटेकर यांचा डायलॉग भारतच काय तर बांग्लादेश (Bangladesh), पाकिस्तान (Pakistan)आणि पार अफगाणिस्तानातही फेमस झाला आहे. मुसळधार पावसाच्या कहराने पुरामुळे (Flood) पाकिस्तानात थैमान घेतले आहे. एवढेच कमी की काय या देशावर मच्छरांनी (Mosquito) आक्रमण केले आहे. त्यामुळे हादरलेल्या पाकिस्तानने भारताकडे मदतीची याचना केली आहे.
पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने भारताकडे 60 लाख मच्छरदाण्यांची मागणी केली आहे. तसेच मंत्रालयाने मच्छरदाण्या खरेदीसाठी मंजूरी ही दिली आहे. देशात पावसाने हाहाकार उडवल्यानंतर मलेरिया आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा झपाट्याने प्रसार होत आहे.
मच्छरांमुळे हे आजार पसरत आहेत. या रोगांना पायबंद घालण्यासाठी पाकिस्तान सरकारने कंबर कसली आहे. या मच्छरदाण्या खरेदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मदत जाहीर केली आहे. या आर्थिक मदतीमुळे पाकिस्तानला मच्छरदाणी खरेदी करता येत आहे. जिओ टीव्हीने याविषयीची बातमी दिली आहे.
जूनच्या मध्यात पाकिस्तानला पावसाने झोडपून काढले. जवळपास एक तृतीयांश पाकिस्तान पुराच्या वेढ्यात अडकला. बचाव आणि मदत कार्य सुरु करण्यात आले. या पावसामुळे 3.3 कोटी लोकांना विस्थापित व्हावे लागले. तर 1700 लोकांचा पुरामुळे मृत्यू ओढावला.
दरम्यान पाकिस्तानवर एक संकट कमी होते की काय म्हणून आता मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. त्यातच मच्छरांची संख्या प्रचंड वाढल्याने अनेक सरकारी कार्यालये आणि सरकारी रुग्णालयात मच्छरदाण्या टाकून कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया बाबत पाकिस्तान सरकारला गंभीर इशारा दिला आहे. जानेवारी 2023 पर्यंत पाकिस्तानातील 32 जिल्ह्यांमध्ये 27 लाख लोकांना मलेरिया होऊ शकतो असा दावा करण्यात येत आहे. यामध्ये वयोवृद्ध आणि लहान मुले सर्वाधिक प्रभावित होण्याची भीती व्यक्त होत आहे.