नवी दिल्ली | 10 जानेवारी 2024 : फ्रान्समध्ये इतिहास घडला आहे. गॅब्रिअल अटल पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत. तर अवघ्या 34 व्या वर्षी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारणारे ते सर्वात तरुण आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ही घोषणा केली. जनमत सर्वेक्षणानुसार ते देशातील सर्वात लोकप्रिय राजकारणांपैकी एक आहेत. गॅब्रिअल अटल हे सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते. पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये त्यांचंही नाव अग्रणी होतं. “मला माहित आहे की तुमची उर्जा आणि तुमच्या वचनबद्धतेवर मी विश्वास ठेवू शकतो.” असे पंतप्रधानपदी गॅब्रिअल यांची नियुक्ती करताना राष्ट्राध्यक्ष म्हणाले.
एलिझाबेथ यांचा राजीनामा
दरम्यान फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. इमिग्रेशनचा मुद्दा सध्या फ्रान्समध्ये गाजत आहे. या वादातून त्यांनी राजीनामा दिला. राजकीय तणाव वाढल्याने त्यांनी नाराजीतून हा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गॅब्रिअल अटल यांच्यावर विश्वासाची मोहर उमटवली.
कसा आहे राजकीय प्रवास
अवघ्या 34 व्या वर्षी गॅब्रिअल अटल फ्रान्सच्या पंतप्रधान पदी विराजमान झाले आहेत. यापूर्वी लॉरेंट फॅबियस हे वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. 17 वर्षांचे असताना त्यांनी सोशलिस्ट पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी ते सरकारचे प्रवक्ते होते. काही दिवसांतच ते फ्रान्सच्या राजकारणातील लोकप्रिय चेहरा ठरले. 2023 मध्ये ते शिक्षण मंत्री होते. त्यांनी राज्यातील शाळांमध्ये मुस्लिम अबाया ड्रेसवर बंदी आणली. त्यानंतर त्यांची अधिक चर्चा झाली. युरोपियन संसदेच्या निवडणुकीपूर्वीच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची ही जबरी खेळी मानण्यात येत आहे.
राजकीय सल्लागाराशी संबंध
फ्रान्सचे नवनियुक्त पंतप्रधान गॅब्रिएल अटल हे 34 वर्षांचे आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे राजकीय सल्लागार स्टीफन सेजॉर्न यांच्याशी त्यांचे संबंध आहेत. साथीच्या आजाराच्या काळात अटल यांना सरकारचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना शिक्षण मंत्री करण्यात आले होते. आता त्यांची पंतप्रधान पदी वर्णी लागली आहे.