israel hamas war | ‘हमास तर केवळ एक…’ तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली वेगळी भूमिका, इस्रायलचा दौराही रद्द केला
हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगाची दोन भागात विभागणी झाली आहे. मुस्लीम देश हमास आणि पॅलेस्टाईनच्या बाजूने एकटवले आहेत. आता तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांनी वेगळी भूमिका घेतली आहे.
तेलअवीव | 25 ऑक्टोबर 2023 : इस्रायलवर मिसाईल हल्ला करुन जगाचा रोष ओढवून घेणाऱ्या हमास या अतिरेकी संघटनेबद्दल तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रैचप तैय्यप अर्दोगन यांनी स्तूतीसुमनं उधळली आहेत. हमासला अतिरेकी संघटना मानण्यास अर्दोआन यांनी चक्क नकार दिला आहे. संसदेत त्यांनी हमासला ही अतिरेकी संघटना नसल्याचे भाषण केले आहे. तसेच इस्रयाल आणि पॅलेस्टिनी युद्धादरम्यान त्यांनी आपला इस्रायलचा दौराही रद्द केला आहे.
तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष अर्दोगन यांनी बुधवारी सांगितले की हमास एक अतिरेकी संघटना नाही. तर ती एक लिबरेशन म्हणजे मुक्ति संघटना आहे. जी आपल्या मातृभूमीसाठी संघर्ष करीत आहेत. संसदेत आपल्या पक्षाच्या सदस्यांसमोर भाषण करताना हे वक्तव्य केले. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की इस्रायलने तुर्कीच्या चांगल्या हेतूंचा फायदा घेतला आहे आधी ठरलेल्या योजनेनूसार आपण आता इस्रायला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्दोगन यांनी बुधवारी सांगितले की, गाझामध्ये हमासच्या अतिरेक्यांवर इस्रायलने सुरु केलेल्या अमानवीय हल्ल्यामुळे आपण इस्रायलला जाण्याची योजना रद्द करीत आहोत. आपण इस्रायलला आधी जाणार होतो. परंतू आता जाण्याचा निर्णय रद्द केला आहे. ते म्हणाले की हमासला आम्ही मुक्तीदाता ( लिबरेटर ) म्हणून पाहात आहोत, ते आपल्या जमिनीसाठी लढत आहेत.
इस्रायलला रोखण्यासाठी दबाव हवा
एवढेच नाही तर त्यांनी जगातील शक्तींनी गाझावर हल्ला करण्यापासून इस्रायलला रोखण्यासाठी दबाव निर्माण करावा अशा मागणी केली. मानवीय मदतीसाठी राफा सीमा खुली ठेवली पाहीजे आणि दोन्ही पक्षांनी ओलिसांच्या सुटकेची प्रक्रीया सुरु केली पाहीजे असेही तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्दोगन यांनी म्हटले आहे. इस्रायल आणि हमास युद्ध रोखण्याच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अक्षमतेबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर दोन्ही देशात युद्ध सुरु असून इस्रायलचे 1400 नागरिक तर पॅलेस्टाईनचे 5,700 नागरिक ठार झाले आहेत.