इस्रायलवरील हल्ल्यासाठी हमासचा जुगाड, पाण्याच्या पाईपपासून बनविले रॉकेट
हमासने इस्रायलवर हल्ला करण्यासाठी पाण्याच्या पाईपलाईनपासून काही घरगुती रॉकेट्स बनविली होती. तांत्रिकदृष्ट्या ती योग्य नसली तरी नुकसान करणारी आहेत.
मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : इस्रायलवर हमासने अचानक पाच हजार रॉकेट डागून जगाला धक्का दिला. परंतू इतके रॉकेट्स हमासकडे कुठून आले याची चर्चा सुरु असताना हमासने केलेला जुगाड समोर आला आहे. गाझाच्या लोकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी युरोपियन युनियनने ( EU ) पाईपलाईन टाकण्यासाठी निधी दिला होता. परंतू हमासच्या अतिरेक्यांनी त्या पाईपलाईनला मृत्यू देणाऱ्या रॉकेट्समध्ये परिवर्तन केल्याचे म्हटले जात आहे. ब्रसेल्सने पॅलिस्टिनींच्या मदतीसाठी 100 मिलियन युरो म्हणजे 876 कोटी रुपयांची मदत केली होती. त्यांनी घरगुती रॉकेट्स तयार करण्यासाठी हे पाईप वापरल्याचे उघड झाले आहे.
हमासचे अतिरेकी नवनवीन इनोव्हेशन वापरुन आपली शस्रास्रे तयार करीत असतात. इस्रायली ड्रोनची नक्कल करणारे घरगुती ड्रोन त्यांनी तयार केली होते. 7 ऑक्टोबरला याच ड्रोनमधून त्यांनी हॅण्ड ग्रेनेड टाकले होते. आणि 20 मिनिटांत 5000 रॉकेट्स त्यांनी डागले होते. 48 किमी लांबीच्या पाईप लाईनचा वापर त्यांनी रॉकेट्स तयार करण्यासाठी केला.
हमासला रॉकेट्स पुरवते
हमासच्या अतिरेक्यांनी मे 2021 मध्ये 11 दिवसांत 4 हजारांहून अधिक रॉकेट डागले होते. इस्रायल डिफेन्स फोर्सने 2200 रॉकेट्सचा दुजोरा दिला आहे. परंतू हमासने त्यांच्याकडे पाच हजाराहून अधिक रॉकेट्स असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना रॉकेट्स पुरविते कोण असा सवाल निर्माण झाला आहे. हमासला इराण, सिरीया आणि सुदान रॉकेट्स पुरवितात. परंतू हे देश ते मान्य करीत नाहीत. हमास आता स्वत:चे रॉकेट बनवायला शिकला आहे. 2014 मध्ये हमासने 4500 रॉकेट इस्रायलवर डागले होते. साल 2019 मध्ये 400 रॉकेट इस्रायलच्या मोठ्या शहरांवर टाकले होते. त्यानंतर 2021 मध्ये चार हजार रॉकेट डागले होते.
कोणत्या रॉकेटचा वापर करतात
हमास इराणमध्ये तयार होणारे फतेह – 110 रॉकेट्सचा वापर करतो. त्यांचे वजन 500 किलोग्रॅम असून त्यांची रेंज 300 किमी आहे. याशिवाय al Quds नावाच्या होममेड रॉकेटचा वापरही ते करतात. त्याच्या टप्प्यात संपूर्ण इस्रायल येते. तसेच सिरीयाचे M-302 रॉकेट्सचाही ते वापर करतात. याशिवाय Qassam नावाच्या रॉकेट्स वापर करतात. 35 ते 50 किलोग्रॅमचे छोट्या पल्ल्याचे हे घातक रॉकेट आहे. पाण्याच्या पाईपलाईनपासून हेच रॉकेट तयार केल्याचे म्हटले जात आहे.