नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास यांच्या लढाईला 20 दिवस लोटले आहेत, परंतू अद्यापही इस्रायलच्या फौजा ( IDF ) मैदानी लढाईसाठी गाझापट्टीत शिरायला अजूनही तयार नाहीत. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर अचानक हल्ला करीत 1,400 नागरिकांचा बळी घेतला. हल्ल्यानंतर पाच दिवसांनी इस्रायलने गाझापट्टीची संपूर्ण घेराबंदी केली आहे. इस्रायलचे रणगाडे आणि चिलखती गाड्या गाझाच्या सीमेवर आहेत. इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासच्या संपूर्ण नायनाट करण्यासाठी इस्रायल मैदानी लढाई करणार असल्याची घोषणा केली होती. परंतू अद्यापही मैदानी लढाईला मुहूर्त मिळालेल्या नाही. गाझाच्या भूयारी भुलभुलैय्यांचा इस्रायलने धसका घेतला आहे का ?
इस्रायलने गाझापट्टीत गेल्याकाही दिवसात थेट आत न शिरता सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. तज्ज्ञांच्या मते हमासची ताकद संपवायची असेल तर आयडीएफला गाझात दाखल होऊन हमासच्या भुयारांच्या विशाल नेटवर्कला आधी संपूर्ण नष्ट करावे लागेल. हे भुयारी मार्गांचे जाळे अनेक दशकांपासून सुरक्षाकवच म्हणून काम करीत आहेत. इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हमास संपूर्ण प्लानिंग करून हा धाडसी हल्ला केला होता. आता इस्रायलच्या सैन्याशी लढण्यासाठी हमासने या भुयारातील मार्गांमध्ये संपूर्ण शस्रसज्ज तयारी केली असल्याचे म्हटले जात आहे. या भुयारातील मार्गांत हमासचे जवळपास 30 हजार लढवय्ये अतिरेकी लपले असल्याचे म्हटले जाच आहे.
गाझासिटीतील भुयारी मार्गांचे जाळे अत्यंत विशाल असून 500 किलोमीटरपर्यंत त्याचा भुलभुलय्या आहे. 1,300 भुयारी मार्ग कुठून सुरु होतात आणि कुठे संपतात हे केवळ हमासच्या सदस्यांना माहिती आहे. या भुयारी मार्गांची खोली 70 मीटर आणि रुंदी तसेच उंची 2 मीटर आहे. गाझासिटीत भुयारीची निर्मिती 1980 च्या दशकात झाली. परंतू 2007 नंतर या शहरावर इस्रायलची नाकेबंदी वाढल्यानंतर त्यांच्या निर्मितीत वेग आला.
हे भुयारी मार्ग हमासची ताकद असून त्यांची लाईफलाईन मानली जात आहेत. या भुयारात औषधे, खाद्य सामग्री, उपकरणासह सर्व गरजेचे सामान लपविले आहे. काही भुयारे थेट इजिप्तच्या सीमेजवळ उघड होत आहे. तेथे वस्तूंची तस्करी करण्यासाठी या भुयारी मार्गांचा वापर होतो आहे. 2013 पूर्वी तस्करी रोखण्यासाठी इजिप्तने 12 किमी लांबीच्या सीमेवर कारवाई केली होती. त्यावेळी येथे 2,500 भुयारे असल्याचे समजले. या भुयारातून रोज 500 टन स्टील आणि 3,000 टन सिमेंट रोज गाझाला पोहचवले जात होते.
गाझापट्टीतील भुयारात हमासचे लढवय्ये लपलेले असून त्यांचा नायनाट केल्याशिवाय गाझात मैदानी लढाई सुरु करण्याचे धाडस इस्रायलचे सैनिक करु शकत नाहीत. या भुयारातील भुलभुलय्यात इस्रायलच्या सैनिकांची जास्त प्राणहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मैदानी लढाई सुरु करण्यात या भुयारांची बाधा येत आहे. बंकर नष्ट करणाऱ्या बॉम्बने या भुयारांना नष्ट करता येऊ शकते, परंतू यात सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू होऊ शकतो अशी अडचण आहे. यातील अनेक भुयारात हमासने आपले रॉकेट आणि अन्य शस्रास्रे लपविली आहेत. त्यातच आपले हेडक्वार्टर, लॉजिस्टीक सेंटर स्थापन केले आहे.