Israel-Hamas War | हमासचा होणार नायनाट, पण इस्रायलला देखील हे युद्ध भारी पडणार
हमासचा नायनाट करण्याची शपथ इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू घेतली असली तर या युद्धाचा खर्च प्रचंड येणार आहे. त्याचा इस्रायलसह जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असे म्हटले जात आहे.
नवी दिल्ली | 12 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध वाढत चालले आहे. दोन्ही बाजूंनी प्रचंड विध्वंस सुरु झाला आहे. इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझापट्टीतील मरणाऱ्यांची संख्या 1354 इतकी झाली आहे. या युद्धात इस्रायल जरी ताकदवान देश असला तरी या देशाच्या अर्थव्यवस्थेसह जगाच्या अर्थव्यवस्थेवर या युद्धाचा फटका बसणार आहे. इस्रायलची बॅंक हापोलिम हीने या युद्धाच्या खर्चाचे जे आकडे जाहीर केले आहेत, ते चक्रावणारे आहेत. दोन्ही देशांमधील हे युद्ध किती लांबणार त्यावर हा खर्च वाढत जाणार आहे.
कोणत्याही दोन देशातील युद्ध अर्थव्यवस्थेसाठी आव्हान असते. इस्रायल आणि हमास दरम्यानच्या युद्धासंदर्भात आंतरराष्ट्रीय नाणे निधीने सावधान केले आहे. हे युद्ध दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेची कंबर तोडेलच परंतू जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील त्याचा परिणाम होईल असे म्हटले आहे. टाईम्स ऑफ इस्रायलमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात इस्रायलच्या हापोलिम बॅंकेच्या हवाल्याने एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात या युद्धासाठी इस्रायलला सुमारे 27 अब्ज इस्रायली शेकेल इतका प्रचंड खर्च येणार आहे.
56,804 कोटी रुपये
हापोलिम बॅंकेच्या ( Hapoalim Bank ) अंदाजाप्रमाणे हाच खर्च अमेरिकन डॉलरमध्ये पाहीला तर तो 6.8 अब्ज डॉलर इतका आहे. तर भारतीय रुपयांत त्याचे मूल्य पाहीले तर ते 56,804 कोटी रुपये इतका असणार आहे. परंतू युद्ध किती लांबेल याचा आताच अंदाज करता येणार नसल्याने या रकमेत वाढ किंवा घट होऊ शकते. इस्रायलने गाझापट्टीवर रॉकेट आणि बॉम्बवर्षाव करीत मोठे नुकसान केले आहे. आता इस्रायलने तीन लाखाची रिझर्व्ह फोर्स ( पायदळ ) जमीनीवरील युद्धासाठी सज्ज केली आहे.
आधीच्या युद्धांचा खर्च
बॅंक हापोलिमचे मुख्य अभ्यासक मोदी शफरीर यांनी म्हटले आहे की सध्याच्या यु्द्धाची स्थिती पाहाता या युद्धाचा खर्च इस्रायलच्या सकल घरगुती उत्पादन ( GDP ) च्या 1.5 टक्के असू शकतो. याचा अर्थ असा आहे की येत्या काळात देशाच्या अर्थसंकल्पा तुटीत जीडीपीच्या 1.5 टक्के वाढ होईल. 2006 मधील लेबनान युद्ध 34 दिवस चालले त्यास 9.4 अब्ज शेकेल म्हणजे 19,776 कोटी खर्च आला होता. तो त्यावेळी जीडीपीच्या 1.3 टक्के होता. ऑपरेशन कास्ट लीडसाठी डिसेंबर 2008 ते जानेवारी 2009 साठी 3.3 अब्ज शेकेल्स म्हणजे 6,943 कोटी खर्च आला होता.