नवी दिल्ली : भारत-कॅनडामधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. सध्या दोन्ही देशातील तणाव टिपेला पोहोचला आहे. कॅनडामध्ये एका खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या झाली होती. त्या प्रकरणात कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. आता कॅनडामध्ये आणखी एका खलिस्तानी समर्थकाची हत्या करण्यात आली आहे. कॅनडामध्ये राहणारा दहशतवादी सुखदूल सिंह अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली. दहशतवादी सुखदूल NIA च्या वाँटेडच्या लिस्टमध्ये होता. खलिस्तानी दहशतवाद्यांना मदत करण्याचा आरोप त्याच्यावर होता. 2017 साली पंजाबमधून पळून तो कॅनडाला गेला होता. खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह विश्वासू अशी सुखदूलची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
त्यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले. निज्जर सारखीच सुखदूलची हत्या करण्यात आली. रिपोर्ट्सनुसार, 2017 साली सुखदूल खोटी कागदपत्र बनवून भारतातून कॅनडाला पळून गेला होता. दहशतवादी सुखदूलवर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. कायद्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी तो भारतसोडून कॅनडाला पळून गेला होता. सुखदूलवर खोटे पासपोर्ट बनवल्याचा आरोप होता. त्या आधारेच तो भारतातून कॅनडाला पळून गेला. सुखदूलवर खलिस्तानी दहशतवाद्यांची मदत केल्याचा आरोप होता. मोस्ट वाँटेड अर्श डल्ला गँग बरोबर सुखदूल सिंहचा संबंध होता. अर्श डल्ला NIA च्या रडारवर आहे.
NIA च्या रडारवर असलेली अर्श डल्ला गँग कोण?
अर्श डल्ला गँगवर 10 लाख रुपयाच इनाम ठेवण्यात आलं आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप केलाय. त्यावरुन प्रचंड तणाव निर्माण झालाय. G20 शिखर परिषदेच्यावेळी जस्टिन ट्रूडो भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करताना त्यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला होता. भारताने त्यावेळी हा आरोप फेटाळून लावला होता. भारत-कॅनडामध्ये जो तणाव आहे, त्याचा दोन्ही देशातील व्यापार आणि शिक्षण क्षेत्रावर परिणाम होणार आहे.