US Election 2020 LIVE : मराठमोळे श्री ठाणेदार अमेरिकेत आमदारपदी, 93 टक्के मतांसह विरोधकांचा धुव्वा
65 वर्षीय श्री ठाणेदार यांनी अमेरिकेतील मिशिगन राज्यातून हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये जाण्याचा मान मिळवला.
2020 US election results | वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे (US President Election) सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी झालेल्या निवडणुकीत मराठमोळ्या उमेदवाराने डंका वाजवला. ‘डेमोक्रेटिक पक्षा’चे भारतीय वंशाचे उमेदवार श्री ठाणेदार यांनी आमदारकी मिळवली आहे. मिशिगनमधून तब्बल 93 टक्के खिशात घालत त्यांनी ‘रिपब्लिकन पक्षा’च्या उमेदवाराचा धुव्वा उडवला. (Indian-origin millionaire Shri Thanedar elected to Michigan state legislature in US)
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले असतानाच मराठीजनांची मान अभिमानाने उंचावणारी बातमी समोर आली. 65 वर्षीय श्री ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून आमदार होण्याचा मान मिळवला. एकूण मतांपैकी 93 टक्के मतदारांचा कौल मिळवत त्यांनी सहा विरोधकांना पराभवाची धूळ चारली.
श्री ठाणेदार हे मूळ बेळगावचे. रसायनशास्त्रात त्यांनी पदवी मिळवली, तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 24 व्या वर्षी 1979 मध्ये ते अमेरिकेला स्थायिक झाले.
गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत नशीब आजमावलं
वैज्ञानिक असलेल्या श्री ठाणेदार यांचं उद्योग जगतातही मोठं नाव आहे. 2018 मध्ये श्री ठाणेदार यांनी गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत नशीब आजमावलं होतं. ‘श्री फॉर व्ही’ हे त्यांचं कॅम्पेन टीव्हीवर गाजलं होतं.
यंदा ते पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. कोरोनाच्या काळातही त्यांनी सॅनिटायझर, मास्क यांचं वाटप करुन मिशिगनमधील जनतेला आधार दिला. गरीबी, गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न सोडवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
डेमोक्रेटिक पक्षातील भारतीय वंशाचे आणखी चार उमेदवार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी पुन्हा निवडून आले आहेत. अॅमी बेरा, प्रमिला जयापाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती अशी या विजयी उमेदवारांची नावं आहेत. विशेष म्हणजे राजा कृष्णमूर्ती यांनी या चारही उमेदवारांना ‘समोसा कॉकस’ असं नाव दिलं होतं. (Indian-origin millionaire Shri Thanedar elected to Michigan state legislature in US)
श्री कुलकर्णींचा पराभव
दुसरीकडे, डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार श्रीनिवास राव प्रेस्टन कुलकर्णी यांना टेक्सासमध्ये पराभवाचा धक्का बसला. रिपब्लिकन पक्षाचे दिग्गज नेते ट्रॉय नेहल्स यांनी श्रीनिवास कुलकर्णी यांचा पराभव केला. कुलकर्णी यांना एक लाख 58 हजार मतं मिळाली, तर नेहल्स यांनी एक लाख 81 हजार मतं मिळवत टेक्सासचा गड जिंकला. कुलकर्णी हे डेमोक्रेटिक पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जात होते.
US Election 2020 : मी राष्ट्रध्यक्षपदाचं कर्तव्य नक्की पूर्ण करेन, अंतिम निकालाआधीच जो बायडन यांचा विजयी नारा#USElectionResults #JoeBidenKamalaHarris2020 https://t.co/N0JUSaHuc9
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
संबंधित बातम्या :
डेमोक्रेटिक पक्षाचे तगडे उमेदवार श्रीनिवास कुलकर्णींचा पराभव
‘समोसा कॉकस’चा दबदबा; भारतीय वंशाच्या चौघांची हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजमध्ये फेरनिवड
(Indian-origin millionaire Shri Thanedar elected to Michigan state legislature in US)