भारतीय विमानाला नाकारली परवानगी, अध्यक्ष मुइज्जू यांच्या हट्टामुळे त्या मुलाचा मृत्यू…
येथील एक मुलगा हा ब्रेन ट्यूमर आणि स्ट्रोकच्या आजाराने त्रस्त होता. त्या मुलाला रात्री पक्षाघाताचा झटका आला. झटका आल्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी लगेच आयलंड एव्हिएशनला फोन केला पण, त्याला पलीकडून उत्तर मिळाले नाही.
नवी दिल्ली | 22 जानेवारी 2024 : भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या जिद्दीमुळे एका 14 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप केला जात आहे. अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताचे डॉर्नियर विमान एअरलिफ्टसाठी वापरण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला असा आरोप होत आहे. दरम्यान, मुलाचा मृत्यू झालेल्या रुग्णालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात येत आहेत.
मालदीवमधील विल्मिंग्टन येथील गाफ अलिफ विलिंगिली या दुर्गम बेटावर ही घटना घडली. येथील एक मुलगा हा ब्रेन ट्यूमर आणि स्ट्रोकच्या आजाराने त्रस्त होता. त्या मुलाला रात्री पक्षाघाताचा झटका आला. झटका आल्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी लगेच आयलंड एव्हिएशनला फोन केला पण, त्याला पलीकडून उत्तर मिळाले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता त्यांना फोन आला. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आणीबाणीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याच्या त्यांनी केलेल्या विनंतीनंतर 16 तासांनी मुलाला राजधानी मालेमध्ये आणण्यात आले. मात्र, येथे आल्यानंतर त्या मुलाला पुढील उपचारासाठी भारतात नेण्याचा सल्ला देण्यात आला.
मालदीव आणि भारत यांच्यातील तणाव वाढला आहे. अशावेळी ही घटना समोर आली. यावेळी त्या मुलाच्या कुटुंबीयांनी आजारी मुलाला भारतात नेण्यासाठी वोमान प्रवस करण्याची परवानगी मागितली. मात्र, अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताने एअरलिफ्टसाठी दिलेले डॉर्नियर विमान वापरण्याची परवानगी दिली नाही. ही परवानगी मिळाली नाही. दरम्यान, त्या मुलाचा मृत्यू झाला.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे उत्पादित आणि भारताने प्रदान केलेल्या डॉर्नियर विमानांचा उपयोग मानवतावादी हेतूंसाठी करण्यात येतो. मात्र, अध्यक्ष मुइज्जू यांनी हेच डॉर्नियर विमान वापरण्याची परवानगी दिली नाही. दरम्यान, मुलाचा मृत्यू झालेल्या रुग्णालया बाहेर नागरिकांची निदर्शने सुरु आहेत.
मालदीवचे खासदार मिकेल नसीम यांनी इंस्टाग्रामवर “लोकांनी राष्ट्रपतींच्या भारताप्रती असलेल्या वैराचे समाधान करण्यासाठी आपल्या जीवाची किंमत चुकवू नये.” अशी पोस्ट केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडण्यास सुरवात झाली आहे. नवे राष्ट्राध्यक्ष चीनकडे अधिक झुकलेले दिसत आहेत. त्यामुळे मालदीव आता ‘इंडिया फर्स्ट’ या दृष्टिकोनातून मागे हटत असल्याचे समोर आले आहे.