Indonesia : इंडोनेशियात लग्नापूर्वी शरीरसंबंधावर बंदी, होऊ शकते इतक्या वर्षांची शिक्षा
Indonesia : लग्नापूर्नवी शरीर संबंध ठेवल्यास इंडोनेशियात तुमच्यावर कायद्याने कारवाई होईल.
नवी दिल्ली : इंडोनेशियाच्या (Indonesia) संसदने मंगळवारी नवीन गुन्हेगारी कायदा आणला. या कायद्यानुसार, लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरणार आहे. लग्नापूर्वीच्या सेक्सवर या देशाने बंदी (Sex Ban) घातली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास एक वर्षांपेक्षा अधिकचा तुरुंगवास सहन करावा लागू शकतो. हा नियम इंडोनेशियातील नागरीक आणि देशात राहणाऱ्या विदेशी नागरिकांवर (Foreign Citizens) लागू असेल. हा नियम दोघांसाठी सारखाच लागू असेल. त्यामुळे इंडोनेशियात जाणार असाल तर सावध असा.
लग्नानंतर पत्नी अथवा पती ऐवजी दुसऱ्या व्यक्तीशी शारिरीक संबंध ठेवल्यास कारवाई होऊ शकते. अशा संबंधावर बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणात पत्नी, पती अथवा मुलांनी तक्रार दिल्यास पोलिसांना थेट कारवाई करता येईल.
नवीन कायद्यानुसार, केवळ पती आणि पत्नीलाच शारिरीक संबंध ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशात जर एखाद्या लग्न झालेल्या अथवा अविवाहित महिला अथवा पुरुषाने या कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल.
एखाद्या व्यक्तीने इंडोनेशियाने तयार केलेल्या नवीन कायद्याचे उल्लंघन केल्यास आणि ते सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येईल. संबंधित व्यक्तीला एका वर्षांचा कारावास आणि दंडाची तरतूद या नवीन कायद्यात करण्यात आली आहे.
पण अशा प्रकरणात विवाहित जोडप्यापैकी एकाने तक्रार देणे आवश्यक आहे. अविवाहित पुरुष आणि महिलांनी शरीरसंबंध ठेवल्यास, आई-वडिलांच्या तक्रारीनंतर पोलीस पुढील कारवाई करतील. त्यानंतर पुढील परिणामांना जोडप्यांना सामोरे जावे लागेल.
कोर्टात ट्रायल सुरु होण्यापूर्वी तक्रार परत घेण्याची मुभा कायद्याने देण्यात आली आहे. पण एकदा कोर्टात हे प्रकरण पोहचल्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. यासोबतच देशाचे राष्ट्रपती, सरकारी संस्थांचा अपमान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.