वॉशिंग्टन पोस्ट ते अल जझीरा, आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही ‘लव्ह-जिहाद’चे पडसाद, कुणाचं काय म्हणणं?
भारतात सध्या कथित ‘लव्ह-जिहाद’च्या मुद्द्यावरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. आता याचे पडसाद आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये उमटले आहेत.
वॉशिंग्टन : भारतात सध्या कथित ‘लव्ह-जिहाद’च्या मुद्द्यावरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेशसह अनेक भाजपशासित राज्यं लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यासाठी हालचाली करत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने तर यावर अध्यादेश देखील जारी केला आहे. यावर विरोधी पक्षांनी भाजपला घेरत धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचा आरोप केला. आता याचे पडसाद आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये उमटले आहेत (International media reports on Love Jihad Hindu right wing organization and Hindu Nationalism).
वॉशिंग्टन पोस्ट
वॉशिंग्टन पोस्टने उत्तर प्रदेशमधील लव्ह-जिहादच्या कायद्यावर भाष्य करताना या निमित्ताने भारतात हिंदू राष्ट्रवाद वेगाने पसरवला जात असल्याचं मत व्यक्त केलंय. वॉशिंग्टन पोस्टने तनिष्क ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीवरही बातमी दिली आहे. तसेच आंतरधर्मीय लग्नांना विरोध करत तनिष्कच्या जाहिरातीवर बहिष्कार टाकण्यामागे हिंदू संघटना जबाबदार असल्याचं म्हटलंय.
न्यूयॉर्क टाईम्स
अमेरिकेचं प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने ‘लव्ह- जिहाद’वरील आपल्या लेखाला ‘अॅन अटॅक ऑन लव्ह’ म्हणजेच प्रेमावरील हल्ला असं शिर्षक दिलंय. यात असं म्हटलं आहे, “भारतातील कट्टर हिंदू संघटना हिंदू मुलीने मुस्लीम मुलाशी लग्न केल्यास थेट त्यांच्यावर हल्ले करत आहे. यात त्यांनी हिंदू संघटनांच्या जबरदस्तीने धर्मांतराच्या दाव्याचाही उल्लेख केलाय. न्यूयॉर्क टाइम्सने यात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचाही आधार घेतला आहे. त्यात आई-वडिलांचा आंतरधर्मीय लग्नाला असलेला आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा ठरवला होता.
अल-जझीरा
अल जझीराने (aljazeera.com) उत्तर प्रदेश सरकारच्या लव्ह जिहादविरोधातील कायद्यावर वृत्त प्रकाशित करताना म्हटलं आहे की भारतात भाजपशासित उत्तर प्रदेशने आंतरधर्मीय लग्नानंतर धर्मांतरण करण्यास गुन्हा ठरवलं आहे. यासाठी लव्ह जिहाद नावाच्या सिद्ध न झालेल्या षडयंत्राचा आधार घेण्यात आला. हिंदू संघटनांनी मुस्लीम युवकांवर लग्नानंतर हिंदू तरुणींचं धर्मांतरण केल्याचा आरोप केला आहे, असंही या वृत्ता म्हटलं आहे.
विशेष म्हणजे अल जझीराने आपल्या वृत्तात लखनौ उच्च न्यायालयाच्या त्या खटल्यातील निकालाचाही उल्लेख केला आहे, ज्यात व्यक्तीगत नातेसंबंधांमध्ये हस्तक्षेप हा निवडीच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. तसेच लग्न करताना धर्माच्या आधारावर आक्षेप घेता येणार नाही असंही म्हटलंय.
द डिप्लोमॅट
‘द डिप्लोमॅट’ने आपल्या लेखात म्हटलं आहे, “भारतातील ‘लव्ह-जिहाद’चा मुद्दा समाजात फूट पाडणारा राजकीय कार्यक्रम आहे. राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व लोकांना एकत्र आणणं आणि जोडून ठेवणं महत्त्वाचं आहे. धर्मनिरपेक्षता मुल्य भारताला स्थैर्य देते. आपल्याला या मुल्याचं संरक्षण करायला हवं आणि या मुल्याविरोधात काम करणाऱ्यांना विरोध करायला हवा. आरएसएसने घराघरात जाऊन हिंदूंना मुस्लिमांपासून दूर राहण्याचं आवाहन करणारं अभियान राबवल्याचाही आरोप द डिप्लोमॅटने केलाय. तसेच भारतातील एका खासगी वृत्तवाहिनीचा आधार घेत ‘लव्ह-जिहाद’ हे भाजपचं अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाविरोधातील अभियान असल्याचाही आरोप करण्यात आलाय.
फ्रान्स 24
फ्रान्सची वृत्तवाहिनी फ्रान्स 24 ने एका वृत्तात म्हटलं आहे, “भारतातील कट्टर हिंदू संघटना मुस्लिमांवर लव्ह-जिहादचा आरोप करत आहेत. भारतीय मुस्लिमांनी हा आरोप फेटाळला आहे. तसेच आमचं नुकसान करण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला आहे.
सीएनबीसी
सीएनबीसीने रॉयटर्सचं वृत्त प्रकाशित केलंय. यात मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठीच हे अभियान चालवलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. यात ‘लव्ह-जिहाद’ची कथित पीडिता आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज तारा सहदेवच्या प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आलाय. यात म्हटलं आहे, “तारा सहदेव यांनी पतीवर लग्नाआधी आपला मुस्लीम धर्म लपवल्याचा आरोप केला होता. या विरोधात रांचीमध्ये हिंदू संघटनांनी आंदोलनंही केली. पोलीस तपासत मात्र लव्ह-जिहादचा दावा केलेल्या 5-6 प्रकरणांमध्ये जबरदस्ती धर्मांतरणाचे कोणतेही पुरावे मिळाले नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने हे लव्ह जिहादचे नसून लव्ह मॅरेजची प्रकरणं असल्याचं म्हटलं. तसेच मुला-मुलीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने वाद झाला.”
संबंधित बातम्या :
योगी सरकारकडून लव जिहादविरोधात अध्यादेश जारी, दोषींना 10 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद
Love Jihad | जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत, हायकोर्टाचा योगी सरकारला झटका
International media reports on Love Jihad Hindu right wing organization and Hindu Nationalism