israel hamas war | या देशात झाली हमासच्या 500 अतिरेक्यांची ट्रेनिंग, वृत्तपत्राच्या दाव्याने खळबळ
इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या अतिरेक्यांनी नृशंस हल्ला करीत 1400 अधिक इस्रायली नागरिकांची हत्या केली होती. त्यानंतर इस्रायलने गाझापट्टीवर हल्ला करीत युद्ध सुरु केले आहे.
नवी दिल्ली | 26 ऑक्टोबर 2023 : इस्रायलवर पॅलेस्टिनीची अतिरेकी संघटना हमासने 7 ऑक्टोबर रोजी मोठा हल्ला करुन इस्रायलच्या 1400 हून अधिक नागरिकांची हत्या केल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीवर आक्रमण केले आहे. यानंतर हमासच्या अतिरेक्यांना कोणी प्रशिक्षण दिले याची माहीती उघड झाली आहे. दि वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हमास आणि इस्लामिक जिहादच्या सुमारे 500 अतिरेक्यांना सप्टेंबर महिन्यात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण दिल्याचे उघडकीस आले आहे.
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या नृशंस हल्ल्यानंतर यामागे इराणचा हात असल्याची संशयाची सुई वळविण्यात येत असतानाच दि वॉल स्ट्रीट जर्नलने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. हमास आणि इस्लामिक जिहाद या संघटनेच्या अतिरेक्यांनी केवळ इस्रायलवर हजारो रॉकेटचा वर्षावच केला नाही तर त्यांचे अतिरेकी बॉर्डरवर लावलेले हायटेक कुंपण कापून सीमेजवळच्या विभागात घुसले. त्यानंतर त्यांनी सर्वसामान्य लोकांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केली. तसेच 224 लोकांचे त्यांनी अपहरण करुन त्यांना गाझापट्टीत घेऊन गेले. दि वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये बुधवारी आलेल्या बातमीनूसार इस्रायलवर हल्ल्याच्या काही आठवड्यापूर्वी शेकडो पॅलेस्टिनी अतिरेक्यांना इराणमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते.
इराणने या हल्ल्याचे समर्थन केले होते. मात्र, या कटामागे आपला हात असल्याच्या आरोपांचा इन्कार केला होता. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीनूसार इराणी ब्रिगेडीयर कुद्स फोर्सचे प्रमुख जनरल इस्माइल कानी या ट्रेनिंग सेशनला उपस्थित होते. हा वृत्तात प्रसिध्द झाल्यानंतर काही तासांत इस्रायल सैनिकांनी इराणवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत हल्ल्याच्या कटाला मदत केल्याचा आरोप केला आहे.
इस्रायलच्या प्रवक्त्याचा आरोप
इराणने हल्ल्याच्या आधी हमासला थेट मदत केली, त्यांना प्रशिक्षण दिले. हत्यारे आणि तांत्रिक मदत केली असे इस्रायल सेनेच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आताही इराण हमास गुप्त माहिती पुरवित असल्याचा आरोप इराणवर केला आहे.यापूर्वी मंगळवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉ यांच्याशी झालेल्या बैठकीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायल इराण, हिजबुल्लाह, हमास यांच्या अतिरेक्यांचा सामना करीत असल्याचा पुनरुच्चार केला होता.
बेरुत येथील बैठकीत हिरवा कंदील
हमास आणि इराण समर्थित हिजबुल्लाहच्या वरिष्ठ सदस्यांच्या सूत्रांच्या आधारे प्रसिध्द केलेल्या या बातमीत इराणी अधिकाऱ्यांनी 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या पाच दिवस आधी बेरुत येथे झालेल्या बैठकीत हिरवा कंदील दाखविला. तर दुसरीकडे अमरिकेतील अधिकाऱ्यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी इराणचे अधिकारी आणि या हल्ल्याचा सरळ काही संबंध दिसत नाही. मात्र इराण खूप काळापासून हमासचा समर्थक असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.