नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमास यांच्यात सातव्या दिवशी पण युद्ध सुरु आहे. गेल्या शुक्रवारी रात्री हमासने अचानक हल्ला चढवला. इस्त्राईलच्या दक्षिण भागात हा हल्ला झाला. इस्त्राईलने प्रतिवार केला. गाझा पट्टीतील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. हा भाग मोडकळीस आल्याची अनेक छायाचित्रातून समोर आले आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूची 4000 हून अधिक व्यक्तींचा मृत्यू ओढावला आहे. तर या युद्धात 5 हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. पण हे युद्ध इस्त्राईल पुरतेच मर्यादीत आहे, असा जगाचा भ्रम हमासने खोटा ठरवला आहे. इस्त्राईल तर केवळ सुरुवात असल्याची धमकी या संघटनेने दिली आहे.
काय दिली धमकी
हमासचा कमांडर महमूद अल-जहर याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्याने हमासची भविष्यातील वाटचाल अवघ्या काही मिनिटात जगासमोर मांडली आहे. इस्त्राईल तर केवळ एक झलक आहे. संपूर्ण जगावर हमासला राज्य करायचे. हमासचे कायदे जगाला मान्य करावे लागतील, अशी धमकी त्याने दिली आहे. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, एक मिनिटाच्या या व्हिडिओत महमूद अल जहर हा विष ओकत आहे. इस्त्राईल केवळ सुरुवातीचे लक्ष्य आहे. त्यानंतर संपूर्ण जगावर अधिराज्य करायचे असल्याची आग तो ओकत आहे. त्यामुळे आतापर्यंत मध्य-पूर्वेतील युद्ध अशा नजरेने पाहणारे देश पण सतर्क झाले आहेत.
व्हिडिओ जुना, झाला व्हायरल
डिसेंबर 2022 मध्ये MEMRI TV यांनी पहिल्यांदा हा व्हिडिओसमोर आणला होता. त्यात इस्त्राईल हे तर सुरुवातीचे टार्गेट आहे. पण नंतर पृथ्वीचे संपूर्ण 510 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र हमासच्या क्षेत्राखाली येईल. या ठिकाणी कोणताही अन्याय होणार नाही. कोणाचे शोषण होणार नाही. कोणतीही हत्या होणार नाही. गुन्हे होणार नाही. सध्या अरब देश, लेबनॉन, सीरिया, इराण, पॅलेस्टाईनसोबत अन्याय होत असल्याचा आरोप या कमांडरने केला आहे.
6000 क्षेपणास्त्र डागले
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या संघटनेचे कंबरडे मोडण्याचा निर्धार व्यक्त केला. इस्लामिक स्टेट समूहाला पण त्यांनी इशारा दिला. 7 ऑक्टोबरपासून आतापर्यत इस्त्राईलने गाझा पट्टीतली हमासच्या ठिकाणांवर 6000 क्षेपणास्त्र आणि बॉम्ब टाकले.