नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : पॅलेस्टाईची दहशतवादी संघटना हमासने इस्त्राईलवर (Israel Palestine Crisis) अचानक शुक्रवारी रात्री हल्ला चढवला. शनिवारी भल्या पहाटे हल्ले तीव्र करण्यात आले. अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार रॉकेटचा मारा करण्यात आला. वादाची किनार जुनीच असल्याने इस्त्राईली लष्काराने पण ताबडतोब प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात 24 तासात दोन्ही बाजूचे जवळपास 600 लोकांना प्राण गमवावा लागला. यात नागरिकांसह लष्करातील जवानांचा आणि दहशतवाद्यांचा समावेश आहे. या वादाला अनेक कांगोरे आहे. गेल्या काही वर्षांपासून अरब राष्ट्रांनी इस्त्राईलशी संबंध सुधारले होते. त्यांना पण आता या वादाचे चटके सहन करावे लागणार आहे कारण हमासचे प्रमुख इस्माईल हनीयेह ( Hamas Leader Ismail Haniyeh) यांनी त्यांना गर्भित इशारा दिला आहे.
अरब राष्ट्रांनी भूमिका बदलली
हमास प्रमुख इस्माईल हनीयेह यांनी अरब राष्ट्रांना पण या वादात ओढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 1950 च्या दशकात अरब राष्ट्रांनी इस्त्राईल राष्ट्र स्थापन करण्याविरोधात युद्ध छेडले होते. त्यात त्यांचा पराभव झाला. मग त्यांनी इतर मार्गांनी पॅलेस्टाईनची चळवळ वाढवली. हमासला छुपा पाठिंबा दिला. पण गेल्या काही वर्षांपासून अरब राष्ट्रांनी इस्त्राईलसोबतचे संबंध सुधारले आहेत. ही जवळीकता हमासला मानवली नाही. त्यांनी यापूर्वी सुद्धा अरब राष्ट्रांना इस्त्राईलसोबत करार केल्याने खडसावले होते. नाराजी व्यक्त केली होती.
काय दिला इशारा
‘मुस्लीम ब्रदरहूड अरब देशांनो, इस्त्राईल अशा परिस्थितीत तुमचे संरक्षण करु शकत नाही. तुम्हाला सुरक्षा देऊ शकत नाही. सर्वच देशांना आम्ही सांगू इच्छितो, विशेष करुन आमच्या अरब भावांना, इस्त्राईल त्याच्या सार्वभौमत्वासाठी लढत आहे, तो तुमची सुरक्षा करु शकत नाही’, असा गर्भित इशारा हमास प्रमुखांनी दिला आहे. त्यामुळे या युद्धाची व्याप्ती वाढेल काय याची चिंता वाढली आहे.
काय झाली घडामोड
अरब राष्ट्रांनी इस्त्राईल राष्ट्र स्थापन्यास प्रखर विरोध केला होता. पण इस्त्राईल अस्तित्वात आले. अनेक देशांनी त्याला मान्यता दिली. पण अरब राष्ट्रे इस्त्राईल सोबत फटकून वागत होते. आता अरब राष्ट्रांनी त्यांच्या भूमिकेत अमुलाग्र बदल केलेला आहे. संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन यांच्यासह मोरोक्को आणि सुदान या राष्ट्रांचे इस्त्राईलसोबत संबंध सुधारले.
युद्ध भडकण्याची भीती
हमास प्रमुख इस्माईल हनीयेह यांनी युद्धाची धग वेस्ट बँक पोहचविण्याचे आदेश दिले आहे. गाझा पट्टीसह वेस्ट बँकेपर्यंत हल्ले वाढविण्याचा आदेश त्यांनी दिला. त्यामुळे इस्त्राईल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध अजून भडकण्याची चिन्ह आहेत. आता अमेरिका काय भूमिका घेते आणि या युद्धात कोणता देश हस्तक्षेप करतो, यावर पुढील घटनाक्रम ठरेल. पण सध्या दोन्ही बाजूंनी हल्ले तीव्र झाले आहेत.