बाइडेन यांचा चीनला इशारा म्हणाले, ताइवानवर हल्ला कराल तर कारवाई करू; चीनने प्रत्युत्तर म्हटले, आम्ही तयार आहोत
बियडेन यांच्या वक्तव्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले - आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करू. राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या चिनी लोकांच्या दृढनिश्चयाला आणि इच्छाशक्तीला कोणीही कमी लेखू नये.
नवी दिल्ली : युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine war) पार्श्वभूमीवर तैवानला धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष जो बियडेन यांनी चेतावणी देत इशारा दिला आहे. क्वाड बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये पोहोचलेल्या बियडेन (US President Joe Biden) यांनी सांगितले की, तैवानवर चीनने हल्ला (China attack on Taiwan) केल्यास अमेरिका लष्करी कारवाई करेल. ते म्हणाले की, चीन तैवान सीमेवर घुसखोरी करून धोका पत्करत आहे. यावर चीनने प्रत्युत्तर देत म्हटले – आम्ही आमच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यास तयार आहोत. अलीकडेच, एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये वरिष्ठ चीनी अधिकारी तैवानवरील हल्ल्याबद्दल बोलत होते. यानंतर बियडेन यांचे वक्तव्य आले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर तैवानच्या बचावाची जबाबदारी आणखी वाढली आहे. चीनने हल्ला केल्यास अमेरिका लष्करी कारवाई करत तैवानचे रक्षण करेल.
व्हायरल ऑडिओ क्लिप
ही क्लिप चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लीक केली होती. ज्यात तैवानवरील हल्ल्याबद्दल बोलण्यात आले होते. अधिकारी या क्लिपमध्ये सांगत आहेत की, कोणत्या कंपन्यांना ड्रोन, बोटी बनवण्यासह उत्पादन क्षमता वाढवण्यास सांगितले आहे. याशिवाय हल्ल्याच्या तयारीवरही चर्चा झाली. या अंतर्गत ग्वांगडोंग प्रांताला 20 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये युद्धाशी संबंधित 239 साहित्य जमा करण्यास सांगितले होते. यामध्ये 1.40 लाख लष्करी जवान, 953 जहाजे, 1,653 मानवरहित उपकरणे, 20 विमानतळांना जोडणाऱ्या गोदी, 6 दुरुस्ती आणि जहाज बांधणी यार्ड आणि धान्य डेपो, रुग्णालये, रक्त केंद्रे, तेल डेपो, गॅस स्टेशन यासारख्या संसाधनांचा समावेश आहे. यासोबतच चीनच्या नॅशनल डिफेन्स मोबिलायझेशन रिक्रूटमेंट ऑफिसला नवीन सैनिकांची भरती ही करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तर ग्वांगडोंगला एकूण 15 हजार 500 लष्करी जवानांची भरती करण्यास सांगितले आहे.
चीनचा पलटवार
बियडेन यांच्या वक्तव्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले – आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करू. राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या चिनी लोकांच्या दृढनिश्चयाला आणि इच्छाशक्तीला कोणीही कमी लेखू नये. तैवान चीनचा भाग आहे. हा मुद्दा चीनचा अंतर्गत मुद्दा आहे. चीनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या मूळ हितसंबंधित मुद्द्यांवर तडजोड केली जाणार नसल्याचेही प्रवक्ते वेनबिन म्हणाले.
तैवान ताब्यात घेणे चुकीचे
बैठकीत बियडेन यांना विचारण्यात आले की, जर चीन तैवानवर ताबा मिळवण्यासाठी शक्ती वापरत असेल तर अमेरिका लष्करी कारवाईचा वापर करत हस्तक्षेप करेल का? याला प्रत्युत्तर म्हणून जो बियडेन म्हणाले – हे आम्ही वचन दिले होते. वन चायना धोरणाला आम्ही सहमती दिली, आम्ही त्यावर स्वाक्षरी केली, पण तैवानला बळजबरीने हिसकावून घेतले जाऊ शकते, असा विचार करणे चुकीचे आहे. बियडेन म्हणाले की, तैवानविरुद्ध बळाचा वापर करण्याचे चीनचे पाऊल केवळ अन्यायकारक ठरणार नाही, तर त्यामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर होईल.
काय हवं आहे चीनला
चीन तैवानला आपला भाग मानतो, तर तैवान स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून पाहतो. तैवानला त्यांच्या राजकीय मागण्यांपुढे झुकण्यास भाग पाडणे आणि चीनचा कब्जा मान्य करणे हे चीनचे ध्येय आहे. रशिया-युक्रेन युद्धापासून चीन तैवानवर कब्जा करण्यासाठी युद्धाचा मार्ग अवलंबू शकतो, अशी भीती निर्माण झाली होती.
चीनची अमेरिकेला धमकी
युक्रेनमधील युद्धाचा फायदा घेऊन चीन तैवानवर हल्ला करू शकतो. शी जिनपिंग यांचा हा कट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बियडेन यांच्या लक्षात आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी तातडीची बैठक घेतली आणि त्यानंतर लगेचच अमेरिकेचे संरक्षण तज्ज्ञ आणि परराष्ट्र मंत्रालयाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ तैवानची राजधानी तैपेई येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर चिडलेल्या चीनने अमेरिकेला धमकी दिली. ते (अमेरिका) आगीशी खेळत असून त्यात स्वत:ला जाळून घेतील, असे त्यांनी धमकीच्या स्वरात म्हटले होते.
चीनी विमाने तैवानच्या सीमेत
चीनकडून तैवानमध्ये घुसखोरी सुरूच आहे. तर चीनी विमाने तैवानच्या सीमेत घुसत आहेत. सामान्यतः ही उड्डाणे तैवानच्या नैऋत्येकडील हवाई क्षेत्रामध्ये होतात. त्याला AIDZ (एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन) म्हणतात. 1949 मध्ये गृहयुद्धात तैवान आणि चीन वेगळे झाले होते. परंतु चीन तैवानवर दावा करत आहे. परिणामी, बीजिंग तैवान सरकारच्या प्रत्येक कृतीला विरोध करताना दिसतात. तर ते तैवानला एकटे पाडण्यासाठी आणि धमकावण्यासाठी मुत्सद्दी आणि लष्करी बळाचा वापर करत आहे.