North Korea Covid Cases:उत्तर कोरियामध्ये वाढत्या कोरोनामुळे तणावात जुलमी किम; लष्कराला दिला हा आदेश
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खराब वैद्यकीय व्यवस्थेमुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात उत्तर कोरियाला अपयश येणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते
उत्तर कोरिया : जगात दोन वर्षांपासून धुमाकूळ घालणारा कोरोनाने (Corona) काही काळ विश्रांती घेतल्याचेच आता समोर येत आहे. कारण गेल्या दोन वर्षांनंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे चीनसह अनेक देशांत आता पुन्हा एकदा कोरोनामुळे चिंतेचे मळभ दाटत चालल्याचे दिसत आहे. याच्या आधी चीनमध्ये कोरोनामुळे अनेक शहरात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आल्यानंतर आता कोरोना उत्तर कोरियामध्ये देखील आपले पाय परसत आहे. त्यामुळे उत्तर कोरियात नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. तर हुकूमशहा किम जोंग उन (North Korea’s leader Kim Jong-un) हा देखील तणावाखाली आला आहे. तर कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान आपल्या लोकांना औषधे पुरवण्यात अपयशी ठरल्याबद्दल किम याने अधिकाऱ्यांना फटकारले आहे. औषधांचा पुरवठा जलद करण्यासाठी हुकूमशहा किम जोंग उन याने लष्कराचे जवान तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनामुळे किमचा तणाव वाढला
उत्तर कोरियामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, सोमवारी कोरोनामुळे मृत्यू होणारी 8 जणांची नोंद झाली. तर आणखी 3,92,920 लोक कोरोनाने ग्रस्त असल्याचे आढळले. उत्तर कोरियाच्या अँटी-व्हायरस आणीबाणी मुख्यालयाने नोंदवले की एप्रिलच्या अखेरीपासून 1.2 दशलक्ष लोकांना कोरोना झाला. त्यापैकी 5,64,860 लोकांना कॉरंटाईन करण्यात आले आहे.
संसर्गामुळे मृतांचा आकडा वाढला
मुख्यालयाच्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. यानंतर देशातील मृतांची संख्या 50 वर पोहोचली आहे. तथापि, तापामुळे त्रस्त झालेल्या आणि आपला जीव गमावलेल्या किती लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली याची पुष्टी राज्य माध्यमांनी केलेली नाही.
बहुतांश लोकांना लस मिळालेली नाही
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खराब वैद्यकीय व्यवस्थेमुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात उत्तर कोरियाला अपयश येणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. असे म्हटले जाते की 26 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या उत्तर कोरियातील बहुतेक लोकांचे लसीकरण झालेले नाही.
तर उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रांच्या कोव्हॅक्स लस वितरण कार्यक्रमाची मदत घेण्याची ऑफर देखील नाकारली आहे. कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळानंतर आता उत्तर कोरियात गुरुवारी पहिल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली आहे.