Caffeine overdose : कॅफीनच्या ओव्हरडोसमुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यूकेमधल्या रुथीन इथं हा प्रकार घडलाय. टॉम मॅन्सफिल्ड (Tom Mansfield), कोल्विन बे येथे राहणारा 29 वर्षीय व्यक्ती हा वैयक्तिक प्रशिक्षक (Trainer) आणि दोन मुलांचा पिता होता. त्यानं कॅफीन पावडर (Caffeine powder) चुकीच्या पद्धतीनं घेतल्यानं ही घटना घडलीय. 5 जानेवारी 2021 रोजी त्यानं हे ड्रिंक घतल्यानंतर तो आजारी पडला, असं बीबीसीच्या वृत्तात म्हटलं आहे. साधारणपणे जीममध्ये जाणारे सहसा आपल्या कामगिरीला चालना देण्यासाठी विशिष्ट डोसमध्ये शिफारस केलेले कॅफिन वापरतात. तज्ज्ञ शिफारस केलेल्या प्रमाणाच्या मर्यादेत राहण्याचा इशारा देतात. मॅन्सफिल्डनं त्याच्या पावडरचं वजन करण्यासाठी स्वयंपाकघरातील तराजूचा वापर केला होता, ज्याचे प्रमाण 2 ते 5000 ग्रॅम इतकं होतं, तर त्याला शिफारस केलेला डोस 60-300 मिलीग्राम दरम्यान घ्यायचा होता.
ब्लॅकबर्न डिस्ट्रिब्युशनकडून 100 ग्रॅम पावडरचा पॅक खरेदी केला होता. 60-300mg एवढं प्रमाण दिवसातून दोनदा घ्यायचं असतं. मात्र मॅन्सफिल्डनं त्यापेक्षा खूप अधिक ते घेतलं. मॅन्सफिल्डच्या पोस्टमॉर्टम तपासणी अहवालात कॅफीनची पातळी प्रति लिटर रक्तात 392 मिलीग्राम असल्याचे नमूद आहे, तर एक कप कॉफी पिण्यापासून सामान्य पातळी सुमारे दोन ते चार मिलीग्राम प्रति लिटर असते.
कॅफीन पावडर प्यायल्यानंतर टॉम मॅन्सफिल्डला हृदयाची धडधड, छातीत दुखणे आणि तोंडात फेस येण्याचा अनुभव आल्यानं त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जेव्हा पॅरामेडिक्स त्याच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी सुमारे एक तास त्याला पुन्हा शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं.