सायबांच्या देशात आज एकाचवेळी कोट्यवधी मोबाईल फोनची रिंग वाजणार, काय आहे प्रकरण
ब्रिटनमध्ये सुरू असलेली वर्ल्ड स्नूकर चॅंपियनशिप देखील काही काळ या मोबाईल अर्लट दरम्यान थांबविण्यात येईल...
लंडन : ब्रिटनवासियांचे मोबाईल फोन आजच्या रविवारी दुपारी तीन वाजता एकाचवेळी खणाणतील किंवा व्हायब्रंट होतील. कोट्यवधी लोकांचे मोबाईल फोन जेव्हा एकाच वेळी वाजतील तेव्हा किती ध्वनी प्रदुषण होईल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. आपल्याला कोरोनाकाळातील ‘थाळी नादा’ची आठवण आल्या वाचून राहीली नसेल. घाबरू नका ! सायबाच्या देशातील नागरिकांच्या मोबाईल फोनमध्ये कुठल्या पॅगासेस गुप्तहेर सॉफ्टवेअरची घुसखोरी झालेली नसून ही एका निर्णयाची रंगीत तालीम असणार आहे.
पूर्वी आपल्याकडे भारत – पाकिस्तान युद्धाच्या वेळी भोंगे वाजायचे, तसे आज ब्रिटनमध्ये सर्व नागरिकांचे मोबाईल फोन एकाच वेळी वाजणार आहेत. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ब्रिटनवासिय रविवारच्या दुपारी मस्त पैकी डुलकी काढत असताना त्यांच्या मोबाईल फोनची रिंग वाजणार आहे. ही काही इस्रायली गुप्तहेर पॅगासेस सॉफ्टवेअरची चाचणी नसून इमर्जन्सी किंवा नैसर्गिक संकटात सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देणाऱ्या तंत्रज्ञानाची जाहीर चाचणी घेण्यात येणार आहे.
कोणत्या देशात आहे ही सिस्टीम
इमर्जन्सी किंवा नैसर्गिक संकटकाळात अशाप्रकारे नागरिकांना एकाचवेळी अर्लट करण्याची सिस्टीम जपान, कॅनडा, नेदरलॅंड आणि अमेरिकेत सुद्धा आहे. या इमर्जन्सी अलार्मची पद्धतीचा उद्देश्य चांगला आहे. जर कोणतेही संकट आले तर लोकांना या अलार्मद्वारे अलर्ट केले जाईल. त्यामुळे ते स्वत:ची योग्यप्रकारे काळजी घेतील.
वर्ल्ड स्नूकर चॅंपियनशिप देखील थांबणार
ब्रिटन सरकारच्या या टेस्टवेळी जर नागरिकांचा मोबाईल सायलंट मोडवर असेल तरी त्याचा अलार्म वाजणार आहे. या दरम्यान ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या काही कार्यक्रम, स्पर्धा यांना थांबविण्यात येणार आहे. वर्ल्ड स्नूकर चॅंपियनशिप देखील काही काळ अर्लट दरम्यान थांबविण्यात येईल, ज्या लोकांना आपल्या फोनवर अलार्म ऐकायचा नाही त्यांना फोन स्विच ऑफ करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राजकीय विरोध
या अनोख्या इमरजन्सी अर्लाम यंत्रणेला राजकीय विरोध ही सुरू आहे. कंझर्वेटीव्ह पार्टीच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या पावलांविरोधात टीका केली आहे. त्यांनी नागरिकांना विनंती केली आहे की सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी लोकांनी आपले मोबाईल फोन स्विच ऑफ करावेत. काही जण या प्रकारला लोकांच्या खाजगी जीवनात सरकारची नको ती ढवळाढवळ असेही म्हणत आहेत. या प्रकाराला ‘नॅनी स्टेट’ असे विशेषण वापरले गेले आहे. जेथे सरकार सामान्य जनतेची नको तितकी काळजी घेते असते.