भारतीय सैनिक मायदेशी परतताच मालदीवची हेकडी उतरली आहे. मालदीवने प्रामाणिकपणे एक गोष्टीबद्दल कबुली दिली आहे. भारतीय सैनिक मायदेशी परतल्यानंतर मालदीवने हे मान्य केलं की, त्यांच्या सैनिकांकडे भारताने दिलेल्या विमानांच संचालन करण्याची क्षमता नाहीय. मालदीवचे संरक्षण मंत्री घासन मौमून यांच्या हवाल्याने रविवारी मालदीवच्या स्थानिक मीडियामध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली. मौमून यांनी सांगितलं की, “मालदीवच्या सैनिकांनी विमान उड्डाणाची ट्रेनिंग सुरु केली होती. पण ते ही ट्रेनिंग पूर्ण करु शकले नाहीत. आता परिस्थिती अशी आहे की, त्यांच्याकडे असा एकही सैनिक नाहीय, जो भारताने दिलेल्या या विमानांच संचालन करु शकेल”
मालदीवमधील न्यूज प्लेटफॉर्म अधाधुच्या एका रिपोर्ट्नुसार, मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाजवळ (MNDF) भारताने दिलेलं विमान चालवू शकणारा एकही सक्षम सैनिक नाहीय. मौमून यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ही माहिती दिली. एका प्रश्नाला उत्तर देताना मौमून म्हणाले की, “मागच्या सरकारमध्ये झालेल्या करारानुसार, काही सैनिकांनी भारताकडून मिळालेलं डोर्नियर विमान आणि दोन हेलिकॉप्टर उडवण्याची ट्रेनिंग सुरु केली होती. पण आता एकही असा सैनिक नाहीय, जो हे विमान चालवू शकेल”
मालदीवचे मंत्री काय म्हणाले?
“भारतीय विमान ऑपरेट करण्याची ट्रेनिंग होती. यामध्ये वेगवेगळे टप्पे पार करायचे होते. आमचे सैनिक वेगवेगळ्या कारणांमुळे ते टप्पे पार करु शकले नाहीत. आमच्या सैन्यात सध्या एकही असा सैनिक नाहीय, ज्याच्याकडे AHL विमान आणि डोर्नियर उडवण्याच लायसन्स आहे किंवा विमानाच संचालन करण्यास सक्षम आहे” असं घासन मौमून म्हणाले.
मुइज्जू सरकारची पोलखोल
मुइज्जू विरोधी पक्षात होते, त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी तत्कालिन सरकारवर टीका केली होती. मालदीवच्या सैन्यात सक्षम पायलट आहेत, तरीही विमान उड्डाणासाठी भारतीय सैनिकांना ठेवलय. पण आता त्यांच्याच सरकारमधील मंत्र्याने पोलखोल केलीय.
भारतीय सैनिकांच्या जागी आता कोण काम करतय?
मालदीवमध्ये तैनात असलेले 76 भारतीय सैनिक मायदेशी परतले आहेत. त्यांच्याजागी हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने पाठवलेल्या टेक्निकल एक्सपर्ट्सना कामाला लावण्यात आलय. मालदीवला जे दोन हेलिकॉप्टर्स दिलेत, त्याची निर्मिती हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडनेच केलीय.