Violence in Jerusalem : अल-अक्सा मशिदीत पॅलेस्टिनी आणि इस्रायली पोलिसांमध्ये संघर्ष; 40 हून अधिक लोक जखमी
अल-अक्सा मशिदीला इस्लाममधील तिसरे पवित्र स्थान मानले जाते. हे ज्यूंचे सर्वात पवित्र स्थान देखील आहे, ज्याला समाजातील लोक टेम्पल माउंट म्हणतात. अल-अक्सा मशीद दीर्घकाळापासून इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षाचे केंद्र आहे.
जेरुसलेम : जगाच सगळ्याच देशात रमजानचा (Ramadan) पवित्र महिना पाळला जात आहे. मुस्लिम नागरिक अल्लाहची इबादत करत आहेत. मात्र याचवेळी जेरुसलेममध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. हा हिंसाचार येथील पवित्र अल-अक्सा मशिदीच्या (Al-Aqsa Mosque) परिसरात झाला आहे. त्यात पॅलेस्टिनींनी इस्रायली पोलिसांवर दगडफेक केली, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी रबर गोळ्या झाडल्या. शुक्रवारी पहाटे झालेल्या हिंसाचारात 40 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायली पोलिसांनी सांगितले की, मशिदीच्या आवारातील पॅलेस्टिनींनी (Palestinian) पहाटेपासून दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. पोलिस ज्या दिशेनं उपस्थित होते त्या दिशेने ही दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी कंपाऊंडमध्ये घुसून रबरी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. पोलिसांनी केलेल्या एक तासांच्या कारवाईनंतर ही हिंसा थांबली. तर यावेळी तेथे असणाऱ्या इतर पॅलेस्टिनींनी कंपाऊंडमध्ये जात कारवाईत हस्तक्षेप केला.
हिंसाचारात 40 हून अधिक लोक जखमी
पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट इमर्जन्सी सर्व्हिसने सांगितले की, या हिंसाचारात 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 22 लोकांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तसेच पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट इमर्जन्सी सर्व्हिसने सांगितले की, हिंसाचार सुरू झाल्यानंतर इस्रायली पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच हिंसक जमावाला कंपाऊंडमध्ये जाण्यापासून रोखले. तर त्यावेळी तेथे असणाऱ्या एका आरोग्य सेविकेला मारहाण करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र हिंसाचारानंतर तीन जणांना अटक करण्यात आल्याचे निश्चितपणे सांगण्यात आले आहे. जेरुसलेमच्या या पवित्र ठिकाणी रमजान महिन्याच्या सुरुवातीपासूनच हिंसाचार उसळत आहे. दगडफेक आणि गोळीबाराच्या फैरीही पाहायला मिळत आहेत.
इस्रायल-पॅलेस्टिनी वादाच्या केंद्रस्थानी अल-अक्सा मशीद
अल-अक्सा मशिदीला इस्लाममधील तिसरे पवित्र स्थान मानले जाते. हे ज्यूंचे सर्वात पवित्र स्थान देखील आहे, ज्याला समाजातील लोक टेम्पल माउंट म्हणतात. अल-अक्सा मशीद दीर्घकाळापासून इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षाचे केंद्र आहे. येथे इस्त्रायली पोलिस आणि पॅलेस्टिनी लोकांमध्ये अनेक संघर्ष झाले आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी गाझा पट्टीवर शासन करणाऱ्या हमास या गटावर हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला आहे. या पवित्र ठिकाणी पोलीस तैनात असल्याचे पॅलेस्टिनींचे म्हणणे आहे. तसेच ज्यू येथे येत राहतात. असे करणे हे अटींचे उल्लंघन असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
संघर्षामुळे ‘युद्ध’चा धोका का निर्माण झाला?
वास्तविक, इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून तणाव सुरू आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात हमासने इस्रायलला जेरुसलेममधील अल-अक्सा मशीद आणि शेख जर्राह परिसरातून पोलिस मागे घेण्यास सांगितले होते. शेख जर्राह येथे राहणाऱ्या पॅलेस्टिनी कुटुंबांना बाहेर काढण्याची भीती होती. अशा स्थितीत ते घाबरले होते आणि हमास इस्रायलला त्यांच्या मदतीसाठी धमकावत होते. त्यावेळी घरे रिकामी करण्यासाठी न्यायालयात सुनावणीही सुरू होती. त्याचबरोबर निदर्शनांचा कालावधीही सुरू होता. जेरुसलेममधील पॅलेस्टिनी लोकांवर इस्रायली पोलिसांनी केलेली कारवाई पाहता हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. यानंतर 11 दिवस दोन्ही पक्षांमध्ये युद्ध चालले. या युद्धात 250 पॅलेस्टिनी आणि 13 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. अशा स्थितीत पुन्हा एकदा असेच वातावरण येथे निर्माण होत आहे. त्यामुळे पुन्हा युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.