मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानात निवडणूकीच्या मैदानात, स्थापन केला नवा पक्ष
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर नृशंस दहशदवादी हल्ला करणारा मास्टरमाईंड हाफीज सईद यालाच आता पीएम करण्याची मागणी पाकिस्तानातील जनता करीत आहे. हाफीज सईदने तुरुंगातून नवा पक्ष स्थापन करीत आपल्या मुलगा, जावई आणि उर्वरित अतिरेक्यांना निवडणूकीच्या मैदानात उतरविले आहे.
मुंबई | 5 फेब्रुवारी 2024 : आपला शेजारी असलेला देश पाकिस्तानात कधी काही होईल याचा नेम नाही. 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात होणाऱ्या सार्वजनिक निवडणूकांमध्ये मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद याने तुरुंगातून आपले उमेदवार उतरविण्याची घोषणा केली आहे. लश्कर-ए-तोयबाचा संस्थापक असलेला हाफीझ सईद सध्या पाकिस्तानातील लाहोर येथील तुरुंगात बंद आहे. बीबीसी उर्दूने दिलेल्या वृत्तानूसार हाफीज सईद याच्या इशाऱ्यावर ‘सेंट्रल मुस्लीम लीग’ नावाचा पक्ष पाकिस्थानातील लोकसभा निवडणूकांमध्ये उतरला आहे. या पक्षाने पाकिस्तानच्या विविध शहरातून अशा लोकांना उमेदवारी दिली आहे जे एकतर हाफीज सईदचे नातेवाईक आहेत वा प्रतिबंधित लश्कर-ए-तोयबा, जमात-उद-दावा किंवा मुस्लीम लीग संघटनेशी जोडलेले आहेत.
सेंट्रल मुस्लीम लीग हा पक्ष हाफीज सईद यांच्या जमात-उद-दावा या संघटनेचा नवा राजकीय चेहरा असल्याचा दावा पाकिस्तानातील धार्मिक पक्षांवर नजर ठेवणाऱ्या विश्लेषकांनी केला आहे. तरीही हाफीज सईद याने या संघटनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानात जमात-उद-दावा या संघटनेवर संपूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे तुरुंगातून बंदी असलेल्या पार्टीचे प्रमुख हाफीज सईद याच्या इशाऱ्यावर निवडणूकीच्या तोंडावरच ‘सेंट्रल मुस्लीम लीग’ ची स्थापना केली आहे. या पक्षातून निवडणूक लढविणारे बहुतांशी उमेदवार मोस्ट वॉण्टेड अतिरेकी आहेत. भारताला हव्या असलेल्या 2008 सालच्या अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफीज सईदचे हे उमेदवार नातेवाईक आहेत.
सईदचा मुलगा, जावई आणि हस्तक मैदानात
हाफीज सईदचा मुलगा हाफीज तल्हा सईद सेंट्रल मुस्लीम लीगच्या वतीने पाकिस्तानातील पंजाब प्रातांची राजधानी लाहोरमध्ये नॅशनल असेंबली मतदार संघ NA-122 मधून निवडणूक लढवित आहे. तसेच हाफीज सईदचा जावई हाफीज निक गुज्जर देखील सेंट्रल मुस्लीम लीगच्या तिकीटावर प्रांतीय विधानसभा क्षेत्रातून पीपी 162 तून निवडणूक लढवित आहे.
आंतरराष्ट्रीय दहशदवादी
मुंबईवर साल 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हाफीज सईद मास्टरमाईंड आहे. त्याला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने जागतिक दहशतवाद्याच्या यादी सामील केले आहे. जागतिक दबावामुळे पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने त्याला अनेक प्रकरणात 31 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो लाहोरच्या तुरुंगात आहे. पाकिस्तान सरकारने लश्कर-ए-तोयबा, जमात-उद-दावा आणि खैर नास सहीत अनेक सहकारी संघटनांवर बंदी आणली आहे.