शिकागो : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल युद्ध दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालल आहे. इस्रायली सैन्याकडून गाझा पट्टीत सतत बॉम्ब वर्षाव सुरु आहे. यात हमासच्या दहशतवाद्यांबरोबर सर्वसामान्य पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी जात आहेत. इस्रायल आणि हमासच हे युद्ध फक्त त्या भागापुरता मर्यादीत नाहीय. जगावर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. प्रत्येक दिवसागणिक हा संघर्ष अधिक वाढत जाईल. त्याचे परिणाम तितकेच गंभीर होतील. जगातील अनेक देशात पॅलेस्टाइन आणि इस्रायल दोघांच्या समर्थनात आणि विरोधात मोर्चे निघत आहेत. काही लोकांच्या मनात परस्पराबद्दल द्वेष भावना वाढत चालली आहे. नुकतीच अमेरिकेच्या इलिनॉय राज्यात एक धक्कादायक घटना घडली. माणूस म्हणून आपल्याला ही घटना निश्चित विचार करायला भाग पाडणारी आहे.
एका 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने एका सहावर्षीय मुस्लिम मुलावर आणि 32 वर्षाच्या महिलेवर हल्ला केला. त्याने लहान मुलाची भोसकून हत्या केली. महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. दोघेही मुस्लिम होते, म्हणून त्याने हा हल्ला केला. आरोपीच्या या कृतीला इस्रायल-हमास युद्धाची पार्श्वभूमी आहे, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी आरोपीविरोधात हेट क्राइमचा गुन्हा नोंदवलाय. शनिवारी सकाळी हा गुन्हा घडला. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा मुलगा आणि महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. वाडीया अल-फायुमी असं मुलाच नाव असून रुग्णलयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वाडीया अल-फायुमी नुकताच 6 वर्षांचा झाला होता. महिला जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपीने एवढ्या लहान मुलाची भोसकून हत्या केली.
911 नंबरवर कॉल
महिलेने आरोपीला प्रतिकार केला. त्याचवेळी तिने 911 नंबरवर कॉल करुन पोलिसांना कळवलं. जोसेफ झुबा असं आरोपीच नाव आहे. त्याच्या डोक्याला मार लागला होता. पोलीस पोहोचले, त्यावेळी तो घराजवळच जमिनीवर बसलेला होता. हेट क्राइम आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा त्याच्याविरोधात नोंदवण्यात आला आहे.