Sunita Williams : अखेर सुनिता विल्यम्सचं सुखरूप आगमन, 9 महिन्यांनी पृथ्वीवर पाऊल टाकताच डॉल्फिन्सचा गराडा, पहा Video

| Updated on: Mar 19, 2025 | 9:36 AM

भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले.

Sunita Williams : अखेर सुनिता विल्यम्सचं सुखरूप आगमन, 9 महिन्यांनी पृथ्वीवर पाऊल टाकताच डॉल्फिन्सचा गराडा, पहा Video
Image Credit source: social media
Follow us on

भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले. आज पहाटे ( भारतीय वेळेनुसार) 3.30 च्या सुमारास फ्लोरिडाच्या किनारी त्यांचे सुखरूप आगमन झाले. 9 महिन्यांपेक्षा अधिक काळा अंतराळात घालवून परत आलेल्या या दोघांची ऐतिहासिक अंतराळ मोहीम यशस्वी रित्या पूर्ण झाली. त्यामुळे अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचं वातावरण आहे.

सुनिता आणि बुच हे दोघेही आता स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतले. अंतराळवीरांचे SpaceX कॅप्सूल बुधवारी (19 मार्च, 2025) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडल्यानंतर काही तासांनी मेक्सिकोच्या आखातात पॅराशूटद्वारे उतरले. फ्लोरिडामधील टालाहसीच्या किनारपट्टीवर हा स्प्लॅशडाउन झाला. अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडिओही जारी केला आहे. त्यांचं कॅप्सूल समुद्रात उतरताच चारही बाजूंनी डॉल्फिन्सनी गराडा घालत त्यांचं अनोखं स्वागतही केलं.

नासाने शेअर केला व्हिडीओ

या पुनरागमनासंदर्भात नासाने एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला. स्पेस स्टेशनवरून परत आलेल्या चारही अंतराळवीरांनी अभिवादनही केलं.

यासंदर्भात नासाने चारही अंतराळवीरांचा पृथ्वीवर लँडिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. यात स्पेस स्टेशनवरून परतलेले अंतराळवीर अभिवादन करताना दिसत आहेत. “पृथ्वीवर परतल्यानंतर Crew9 ची पहिली झलक आपल्याला पहायला मिळत आहे! आता रिकव्हरी पथके ड्रॅगनमधून बाहेर येण्यासाठी क्रूची मदत करतील. दीर्घकाळाच्या मोहिमेवरून परतल्यानंतर सर्व क्रू सदस्यांसाठी असलेली ही एक मानक प्रक्रिया आहे,” असे नमूद केलं.

जूनमध्ये स्पेस स्टेशनवर गेल्या होत्या सुनिता विल्यम्स

सुनिता विल्य्म्स आणि बुच विल्मोर या दोघांनीही  गेल्या वर्षी 5 जून रोजी केप कॅनवेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. ते आठ दिवसांच्या मिशनसाठी गेले होते मात्र, अंतराळ यानामधून हीलियमची गळती आणि वेग कमी झाल्यामुळे ते जवळपास नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकले. अथक प्रयत्नांनंतरही त्यांचं पृथ्वीवर पुनरागमन वारंवार लांबत होतं. अखेर आज पहाटे ते यशस्वीरित्या पृथ्वीवर लँड झाले आणि त्यांच्या कुटुंबियांसह जगभरातल सर्वांचांच जीव भांड्यात पडला.