VIDEO | रोवर लँडिंगवेळी डोक्यात काय चाललेलं? ‘मिशन मार्स’मधील भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन यांच्याशी बातचित
नासाच्या मिशन मार्समधील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांच्याशी 'टीव्ही 9'ची विशेष बातचित (NASA Indian Origin Scientist Swati Mohan)
वॉशिंग्टन : ‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संस्थेने मंगळ ग्रहावर पाणी आणि जीवसृष्टीचा तपास करण्यासाठी रोव्हरला पाठवले आहे. ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’च्या यशस्वी लँडिंगचे संपूर्ण श्रेय भारतीय वंशांच्या महिल्या शास्त्रज्ञाला जाते. शेवटच्या सात मिनटात रोव्हरचा वेग शून्यावर आणत सुरक्षित लँडिंग करण्याची मोठी जबाबदारी भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांनी यशस्वीरित्या पेलली. या संपूर्ण मिशनमधील सर्वात कठीण आणि धोकादायक क्षण होता रोव्हर मंगळावरील सर्वात अवघड जजिरो क्रेटरवर उतरतानाचा. शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांच्याशी ‘टीव्ही 9’ने बातचित केली. (NASA Mission Mars Indian Origin Scientist Swati Mohan Exclusive Chat)
प्रश्न – सुरुवातीला रोवर लँडिंग होत असताना तुमच्या डोक्यात नक्की काय सुरु होतं?
स्वाती मोहन – मला काय करायचं आहे, यावर माझं पूर्ण लक्ष केंद्रित होतं. मला काहीच कळत नव्हतं, की नक्की इथे काय झालं. काही वेळानंतर जेव्हा सगळे आनंदाने जल्लोष करायला लागले, तेव्हा मला कळलं की रोवर खरंच लँड झालं आहे. त्यानंतर मी खुर्चीवरुन उठून सगळ्यांसोबत सेलिब्रेट केलं.
प्रश्न – मिशन अयशस्वी होण्याची भीती तुम्हाला होती का?
स्वाती मोहन – हो… आम्ही आमचा बहुतांश वेळ मिशन यशस्वी करण्यासाठी खर्ची घातला होता. संपूर्ण मेहनत केली होती. मात्र, अनेकदा गोष्टी आपल्या नियोजननुसार होत नाहीत, याची भीती होती.
प्रश्न – रोवर लँडिंग झाल्यानंतर तुम्हाला झोप लागली का?
स्वाती मोहन – लँडिंग झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ सेलिब्रेशन केलं. त्यानंतर मी लवकर झोपायचा प्रयत्न केला. मात्र, तरीही पहाटे 4:30 वाजता मला जाग आली. कारण माझ्या शरीराला लवकर उठण्याची सवय झाली होती. गेल्या 2 आठवड्यांपासून रोवर लँडिंगची तयारी सुरु असल्यामुळे लवकर उठावं लागत होतं. पुढच्या काही दिवसात शरीराला आराम मिळेल, अशी आशा आहे.
प्रश्न – तुमच्या बालपणाविषयी आम्हाला काही सांगा ना, भारतीय वारशाचा तुमच्या यशात किती वाटा आहे?
स्वाती मोहन – मी लहानपणापासून पेन्सिलवेनियामध्ये राहत होती आणि त्यानंतर मी वॉशिंग्टन डीसीला स्थलांतरित झाले. जरी मी अमेरिकेत मोठी झाले असले, तरी माझ्या पालन-पोषणात भारतीय मुळांचा मोठा वाटा आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी भारतीय वारसा कधीच वेगळा होऊ दिला नाही. विशेष म्हणजे, शिक्षण पूर्ण करणं हे महत्तवाचे आहे. मला नेहमी शिक्षण पूर्ण करण्यात आई वडिलांनी खूप साथ दिलीये. हायस्कूलमध्ये असतानाच मी इंटर्नशिप पूर्ण केली. पैशाबाबत कधीच तडजोड न करता मला माझ्या आवडत्या संस्थेत शिक्षण घेण्याची संधी दिली. मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली असून नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले.
प्रश्न – हे यश संपादन करताना तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल?
स्वाती मोहन – मला सांगायचं आहे की तुम्ही नेहमीच आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा. एक यशस्वी कामगिरी तुम्हाला घडवते, असं काही नसतं. कुठल्याही गोष्टीत यशस्वी किंवा अयशस्वी ठरलात तर त्यातून तुम्ही काय शिकालात हे महत्त्वाचं असतं. पुढे जाण्यासाठी मेहनत घ्यावी लागते ज्याने तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येईल.
प्रश्न – भारतात राहणाऱ्या नातेवाईकांनी तुमच्या यशाबद्दल काय प्रतिक्रिया दिली?
स्वाती मोहन – सगळ्यांनी मला मेसेज केले, मला फोन बंद करावा लागला कारण मला लक्ष केंद्रित करायचं होतं. जेव्हा मी माझा फोन सुरु केला तेव्हा मला 100 हून अधिक मेसेज आले होते. सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या.
पाहा व्हिडीओ :
(NASA Mission Mars Indian Origin Scientist Swati Mohan Exclusive Chat)