ओसामा बिन लादेनचा पूत्र हमजा अजूनही जीवंत, पाश्चात्य देशांवर हल्ल्याच्या तयारीत असल्याचा तज्ज्ञांचा दावा
ओसामाचा मुलगा हमजा हा अमेरिकेवरील 9/11 सारखा आणखी एखादा हल्ला करण्याची तयारी करीत असल्याचा दावा गुप्तचर यंत्रणांनी केलेला आहे.
अमेरिकेवर 9/11 चा हल्ला करणारा ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन जीवंत असल्याचा दावा गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. हमजा हा साल 2019 मध्ये ठार झाल्याचा अंदाज होता. परंतू तो जीवंत असून अल कायदाचे नेतृत्व करीत असल्याचे म्हटले जात आहे. अफगाणिस्तानात हमजा दोनशेहून अधिक स्नायपर कमांडोच्या सुरक्षेत असून त्याने पाश्चिमात्य राष्ट्रांवर हल्ला करण्याची योजना आखल्याचे वृत्त मिरर या वृत्तपत्राने दिले आहे.
हमजा याचा भाऊ अब्दुल्लाह हा देखील या अल कायदा संघटनेत आहे. हमजा हा अफगाणिस्तानात खुलेआम फिरत असून तो त्याचे वडील ओसामा बिन लादेन याच्या अमेरिकेने केलेल्या हत्येचा बदला घेणार असल्याचे म्हटले जात आहे. हमजा आणि त्याच्या कुटुंबियाचे संरक्षण अफगाणिस्तानच्या वरिष्ठ तालिबानी नेते करीत आहेत. ते त्याची सुरक्षा करीत असून त्याला संरक्षण पुरवित आहेत.
तालिबानच्या राजवटीत 21 हून अधिक दहशतवादी संघटना कार्यरत असून ते सुसाईड बॉम्बर आणि दहशतवादी हल्ल्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देत आहेत. अफगाणिस्तानातील हेलमंड, गजनी. लघमन, परवान,उरुजगन, झाबुल, नांगरहार, नुरीस्तान,बडघीस आणि कुनार या ठिकाणी अतिरेक्यांची प्रशिक्षण सुरु आहे.अफगाणी सिराजुद्दीन हक्कानी हा देखील हमजाला मदत करीत आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे अल-कायदा अतिरेकी संघटनेला सुरक्षित वातावरण मिळाल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी साल 2022 मध्ये दिला होता.
अमेरिकेला वाटले ठार झाला पण…
हमजा हा साल 2019 मध्ये एअर स्ट्राईक हल्ल्यात ठार झाल्याचा अमेरिकेचा समज होता. परंतू त्याच्याबद्दल इतर माहिती अमेरिकन सैन्यानी दिली नव्हती. हमजा याचे वडील ओसामा याची साल 2011 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे स्पेशल ऑपरेशन राबवून हत्या केली होती. ओसामा बिन लादेन याने अमेरिकेवर केलेल्या 9/11 च्या हल्ल्यात 3000 हून अधिक अमेरिकन नागरिक ठार झाले होते.