पैगंबर मोहम्मद यांच्यावरच्या वक्तव्यानं आखाती देशात आक्रोश, कतार, कुवैत, इराणकडून भारतीय राजदूतांना पाचारण, भाजपही अॅक्शन मोडमध्ये !
नुपूर शर्मांनी जे वक्तव्य केलं, त्याला आठवडा उलटतोय पण त्याचे परिणाम आखाती देशात गेल्या दोन तीन दिवसात अधिक तीव्र झालेत. भारतीय वस्तूंचा बहिष्कार करा अशा प्रकारचे ट्रेंड ट्विटरवर चालवले गेले. त्यानंतर भाजपनं दोन्ही नेत्यांना घरी बसवलं.
भाजपच्या दोन प्रवक्ते-नेत्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं आखाती देशात नाराजी पसरलीय. दोन्ही नेत्यांच्याविरोधात ट्विटरवर मोठं कँपेन चालवलं गेलं. त्याचा परिणाम त्या त्या देशातही दिसून येतोय. कतार, कुवैत, इराणनं (Qatar, Kuwait, Iran) भारतीय राजदूतांना पाचारण करत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केलीय. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीही अॅक्शन मोडमध्ये आहे. दोन्ही नेत्यांवर कारवाई केली गेलीय. तसच त्या त्या देशात राजदूतांनी संबंधीत नेत्यांचे विचार ही भारताची भूमिका नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी काही काळात हा वाद मिटण्याची चिन्हं दिसतायत.
इराणची कडक भूमिका
इराणचे परराष्ट्र मंत्री पुढच्या काही काळात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधीच भारतात मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे पडसाद इराणमध्ये पहायला मिळाले. इराणमधल्या भारतीय राजदूतांना पाचारण केलं गेलं आणि इराणनं नुपूर शर्मा तसच नवीन जिंदल यांच्या वक्तव्याचं स्पष्टीकरण मागितलं. तसच इराणनं स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यावर इराण ट्विट करत माहिती दिलीय-पहिल्यांदाच पुढच्या आठवड्यात इराणचे परराष्ट्र मंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी तेहरानमधल्या भारतीय राजदूतांना पैगंबर मोहम्मद यांचा जो टीव्ही शोमध्ये अपमान झाला त्या मुद्यावर बोलावलं गेलं.त्या बैठकीत भारतीय राजदूतानं दिलगिरी व्यक्त केलीय. तसच पैगंबर मोहम्मद यांचा झालेला अपमान हा सहन करण्यासारखा नाही. भारत हा सर्व धर्मांचा आदर करतो. पैगंबरांचा जो अपमान झाला ती भारताची भूमिका नाही.
Ahead of the Iranian Foreign Minister’s first-ever trip to New Delhi next week, Iran’s Ministry of Foreign Affairs has summoned the Indian ambassador to Tehran over what state media called “insult against Prophet of Islam in an Indian TV show”.
— Iran International English (@IranIntl_En) June 5, 2022
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा
इराणचे परराष्ट्र मंत्री होसैन अमीर अबदुल्लाहियन हे पुढच्या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशात द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल. काहीही करारांवर स्वाक्षऱ्याही केल्या जाणार आहेत. होसैन हे जानेवारी महिन्यातच येणार होते पण कोरोनामुळे त्यांना दौरा टाळावा लागला. आता ते पुढच्या आठवड्यात दिल्लीत असतील. त्याआधीच हा सर्व वाद मिटवण्याचा प्रयत्न केंद्र तसच भाजपाकडून केला जातोय.
Qatari foreign ministry readout on summoning of Indian envoy: pic.twitter.com/vBulLI8s7n
— Rezaul Hasan Laskar (@Rezhasan) June 5, 2022
कुवैत, कतारकडूनही निषेध
दरम्यान कुवैतच्या परराष्ट्र मंत्रालयानेही भारतीय राजदूतांना पाचारण केलं आणि अधिकृत निषेधपत्र हाती दिलं. त्यात पैगंबरांचा जो अपमान केला गेला त्याची कडक शब्दात निंदा केली गेलीय. त्यावर भारतानेही याबाबत काय कारवाई केली ते जाहीर केलं. एवढच नाही तर भारतीय राज्यघटना सर्व धर्मांचा आदर करते हे स्पष्ट केलं गेलं.कतारची राजधानी दोह्यातही भारतीय राजदूताला बोलावून अरब देशातल्या स्थितीचा अंदाज दिला गेला. नुपूर शर्मांनी जे वक्तव्य केलं, त्याला आठवडा उलटतोय पण त्याचे परिणाम आखाती देशात गेल्या दोन तीन दिवसात अधिक तीव्र झालेत. भारतीय वस्तूंचा बहिष्कार करा अशा प्रकारचे ट्रेंड ट्विटरवर चालवले गेले. त्यानंतर भाजपनं दोन्ही नेत्यांना घरी बसवलं. कतारनं भारताच्या त्या भूमिकेचं स्वागत केलं. ज्यांनी अपमान केला, त्यांच्यावर कारवाई केली गेल्याचं राजदूतांनी कतारला कळवलं, त्यानंतर आखाती देशांचा विरोध आता मावळण्याची चिन्हं आहेत.