‘पुलवामात भारताला घरात घुसून मारलं’, चौफेर कोंडीनंतर पाकिस्तानच्या मंत्र्याचा यू-टर्न
भारतातील पुलवामा हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानची कोंडी होताना दिसताच पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनी आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतला आहे.
इस्लामाबाद : भारतातील पुलवामा हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानची कोंडी होताना दिसताच पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनी आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतला आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण देत फवाद चौधरी यांच्याकडून आता सारवासारव करण्याचा प्रयत्न होत आहे. याआधी फवाद चौधरी यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये चर्चा करताना पुलवामा हल्ला हा इम्रान खान सरकारची मोठी उपलब्धी असल्याचं म्हटलं होतं (Fawad Chaudhry on Pulwama) (Pakistan Minister Fawad Chaudhry U turn over Pulwama attack statement).
फवाद चौधरी नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना म्हणाले, “आम्ही भारताला घरात घुसून मारलं. पुलवामामध्ये आपल्याला मोठं यश मिळालं. पाकिस्तानचं हे यश इम्रान खान यांच्या नेतृत्वात देशाला मिळालं. तुम्ही आणि आम्ही सर्वजण या यशाचे भागीदार आहोत.”
जागतिक स्तरावर कोंडी झाल्यानंतर फवाद चौधरींची सारवासारव
फवाद चौधरी यांनी पाकिस्तानची जागतिक स्तरावर कोंडी झाल्यानंतर आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतलाय. माध्यमांशी बोलताना फवाद चौधरी म्हणाले, “माझं वक्तव्य अगदी स्पष्ट होतं. मी पाकिस्तानच्या ऑपरेशन स्विफ्ट रिसोर्टविषयी बोलत होतो. पाकिस्तानचं हे ऑपरेशन भारताच्या बालाकोट एअरस्ट्राईकनंतर करण्यात आलं होतं. यात पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय हवाई दलाचे विमान पाडले होते. पायलट अभिनंदन वर्धमान यांना पकडलं होतं. मात्र, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी पुलवामा हल्ल्याबद्दल नाही, तर त्यानंतरच्या कारवाईबद्दल बोलत होतो.”
फवाद यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारताने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्यदल प्रमुख व्ही. के. सिंह यांनी हा मुद्दा जागतिक स्तरावर उचलण्याची आणि FATF मधून पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली आहे.
फवाद यांनी हे वक्तव्य नेमकं कुठे आणि का दिलं?
पाकिस्तान मुस्लीम लीग-एनचे (PML-N) नेते अयाज सादिक यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेतले तेव्हा एका बैठकीत परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्या पायांचा थरकाप होत होता, असं विधान केलं होतं. यावर बोलताना फवाद चौधरी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये बोलत होते.
फवाद चौधरी म्हणाले, “सादिक म्हणतात कुरेशी यांच्या पायांचा थरकाप होत होता, मात्र मी म्हणेल की पाकिस्तानने भारताला घरात घूसून मारलं. पुलवामात इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानला मोठं यश मिळालं. त्याचे आपण सर्व भागिदार आहोत.”
हेही वाचा :
पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याची कबुली, इम्रान खानच्या मंत्र्याने पाकला उघडं पाडलं
कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रांची कमतरता, नवाज शरीफांची कबुली
Pakistan Minister Fawad Chaudhry U turn over Pulwama attack statement