पत्रामध्ये नेमकं दडलंय तरी काय? इम्रान खान यांनी उल्लेख केलेलं ‘ते’ पत्र आता सरन्यायाधीशांकडे सादर केले जाणार, अॅटर्नी जनरल कार्यालयाचा अक्षेप
पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी सोमवारी इस्लामाबादमधील रॅलीत ज्या 'गूढ पत्र'चा उल्लेख केला होता, ते पत्र आता देशाच्या सरन्यायाधीशांना (Pakistan Chief Justice) दाखवले जाणार आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुखाने ही माहिती दिली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी सोमवारी इस्लामाबादमधील रॅलीत ज्या ‘गूढ पत्र’चा उल्लेख केला होता, ते पत्र आता देशाच्या सरन्यायाधीशांना (Pakistan Chief Justice) दाखवले जाणार आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुखाने ही माहिती दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या पक्षांच्या प्रवक्त्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी या पत्राबाबत माहिती दिली होती. या बैठकीत पक्षाच्या सध्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत बोलताना इम्रान खान यांनी त्यांचा पक्ष तहरीक-ए-इंसाफचे सरकार पाडण्यामागे परदेशी शक्तींचा हात असल्याचा देखील दावा केला होता. या पत्राच्या रुपाने आपल्याकडे त्यासंदर्भात पुरावा असल्याचे देखील इम्रान यांनी म्हटले होते. आता हे पत्र पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना दाखवण्यात येणार आहे. या पत्रामध्ये नेमकं काय दडलं आहे? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
अॅटर्नी जनरल कार्यालयाकडून अक्षेप
दरम्यान हे पत्र सरन्यायाधीशांना दाखवण्याच्या मुद्द्यावर अॅटर्नी जनरल कार्यालयाने (एजीपी) ने अक्षेप घेतला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल खालिद जावेद खान यांनी या पत्राबाब बोलताना म्हटले आहे की, हा विषय न्याय किंवा न्यायव्यवस्थेशी संबंधित नाही. त्यामुळे हे पत्र सरन्यायाधीशांना दाखवण्याची गरज नसल्याचे खान यांनी म्हटले आहे. दरम्यान अॅटर्नी जनरल कार्यालयाच्या अक्षेपानंतर हे पत्र सरन्यायाधीशांपर्यंत पोहोचणार का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
रॅलीत इम्रान यांनी नेमंक काय म्हटले होते?
27 मार्च रोजी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत इम्रान खान यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. पाकिस्तानी सरकार अस्थिर करण्यामागे विदेशी शक्तींचा हात असल्याचे इम्रान यांनी म्हटले होतो. विदेशी शक्ती आमच्या पक्षाचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते पाकिस्तानमधील लोकांचा उपयोग करत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता. एवढेच नाही तर मला लेखी धमकी देण्यात आल्याचा दावा देखील त्यांनी या रॅलीत केला होता. मात्र काहीही झाले तरी मी राष्ट्रहिताशी तडजोड करण्यार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.