इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समोर येते आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एका पोलीस ठाण्याला लक्ष्य केले आहे. फिदायन दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यात घुसून स्वत:ला उडवले. या हल्ल्यात 12 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर 40 हून अधिक जण जखमी असल्याचंही स्पष्ट करण्यात आले आहे.
खैबर पख्तुनख्वामधील मलाकंद विभागातील स्वात जिल्ह्यातील कबाल पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.
पोलीस ठाण्याच्या आत किमान दोन स्फोट झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. तर पोलीस स्थानकातील परिसरातील पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
या दहशतवादी हल्ल्यात 12 पोलिसांचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर परिसरात हल्लकल्लोळ माजला होता.
पोलिसांनी सांगितले की, हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खैबर पख्तुनख्वाचे पोलीस महानिरीक्षक अख्तर हयात खान यांनी सांगितले की, पोलिस स्टेशनमध्ये 2 स्फोट झाले आहेत.
हा स्फोट इतका भीषण होता की, पोलीस ठाण्याची संपूर्ण इमारत कोसळली आहे. त्यामुळे अनेक पोलीस यामध्ये जखमी झाले आहेत
दुसरीकडे सीटीडीचे डीआयजी खालिद सोहेल यांनी सांगितले की, इमारतीमध्ये स्फोट झाला असून त्यामुळे परिसरातील वीज गेली आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला खान यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल त्यांनी दु:खही व्यक्त केले आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या या कारवाया लवकरच संपवून टाकल्या जातील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्क्त केला.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादाच्या घटना वाढल्या आहेत. येथे दहशतवादी कायदा पाळणाऱ्यांना लक्ष्य करत आहे. सध्या पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे.