पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या संसदेला संबोधित करणार, ट्विट करत म्हणाले-आमंत्रणासाठी धन्यवाद…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या संसदेत ते दुसऱ्यांदा बोलणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2016 मध्ये येथे भाषण केले होते. सात वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी अमेरिकेच्या संसदेत भाषण करणारे पाचवे पंतप्रधान आहेत.
नवी दिल्ली: अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान तेथील संसदेला संबोधित करण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ट्विटरवरून अमेरिकेचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पीकर केविन मॅकार्थी यांना टॅग करत धन्यवाद म्हटले आहे. तसेच मॅककार्थी व्यतिरिक्त पीएम मोदी यांनी मॅक कोनेल, सेन शुमर आणि जेफ्रीज यांनाही त्यांनी टॅग केले आहे. या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, हे निमंत्रण स्वीकारताना मला माझा गौरव वाटतो आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आमंत्रणाबद्दल भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, तेथील संसदेला संबोधित करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसातच अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत.
त्यावेळी तिथे ते 22 जून रोजी अमेरिकन संसदेतील संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. अमेरिकेसोबतच्या सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारीचा भारताला अभिमान असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. या भागीदारीबाबत लोकशाही मूल्ये, लोक ते नागरिकांचे संबंध आणि जागतिक शांततेसाठी वचनबद्धतेला त्यांनी महत्व दिले आहे.
तर दुसरीकडे, अमेरिकन संसदेच्यावतीने असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकन संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करणे हा अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृह आणि युनायटेड स्टेट्स सिनेटचा तो गौरव आहे.
Thank you @SpeakerMcCarthy, @LeaderMcConnell, @SenSchumer, and @RepJeffries for the gracious invitation. I am honored to accept and look forward to once again address a Joint Meeting of the Congress. We are proud of our Comprehensive Global Strategic Partnership with the US,… https://t.co/yeg6XaGUH2
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2023
सात वर्षांपूर्वी अमेरिकन संसदेच्या संयुक्त बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाचा कायमस्वरूपी परिणाम होऊन अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या संसदेत ते दुसऱ्यांदा बोलणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2016 मध्ये येथे भाषण केले होते. सात वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी अमेरिकेच्या संसदेत भाषण करणारे पाचवे पंतप्रधान आहेत. यापूर्वी 2005 मध्ये डॉ.मनमोहन सिंग, 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी, 1994 मध्ये पीव्ही नरसिंह राव आणि त्याआधी 1985 मध्ये राजीव गांधी यांनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित केले होते.