Political Crisis in Pakistan : तर भारतात चालते व्हा, नवाज शरीफच्या मुलीनं इम्रान खानला सुनावलं, इम्रान म्हणतात, भारतीय खुद्दार ‘कौम’ !
पण आरएसएसची विचारधारा आणि काश्मीवरबद्दल भारत सरकार जे काही करतं त्यावरुन मात्र निराश आहे. त्यामुळेच आपले संबंध खराब आहेत. नसेल तर माझी भारतासोबत कुठलीच दुश्मनी नाही.
पाकिस्तानमध्ये राजकीय संकट आहे. आज इम्रान खान सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाईल. पण त्याआधीच इम्रान खान आणि त्यांचे विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत आणि ह्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहेत भारतीय राजकारणात घडलेल्या घटना. गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान यांनी तर भारतीय नेते, इथली लोकशाही यांचा जप सुरु केलाय. आज तर ते म्हणाले की, भारतीय ‘कौम’ स्वाभिमानी आहे, त्यांना कुणीच डिक्टेट करु शकत नाही. इम्रान खान यांचा उद्देश पाकिस्तानी जनतेनेही तसच असावं असा आहे. पण इम्रान खानच्या ह्या भारतीय जपावर तिथले विरोधी नेते तुटून पडलेत. त्यातही नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी तर इम्रान खानना भारतीय लोकशाहीचा धडाच शिकवला.
काय म्हणाल्या मरियम नवाज?
पाकिस्तानमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडतायत त्यापार्श्वभूमीवर काळजीवाहू पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधीत केलं. त्यात त्यांनी भारतीय नेते, भारतीय सिस्टीम, लोकशाही अशा अनेक गोष्टींची स्तुती केलीय- नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी भारतीय लोकशाही कशी ग्रेट आहे हे सांगताना थेट वाजपेयींचं सरकार कसं एक मतानं पडलं होतं आणि तरीही भारतात कसं तिथल्या राजकीय प्रणालीवर कुणीच प्रश्नचिन्हं निर्माण केलं नाही याची आठवण इम्रान खानला करुन दिली. एवढच नाही तर मरियम म्हणाल्या, मी पहिल्यांदाच कुणाला तरी सत्तेसाठी एवढं रडताना पहातेय. इम्रान खान हे सत्तेसाठी रडतायत. ह्या माणसानं लक्षात ठेवायला हवं की त्याला दुसऱ्या कुणी काढलेलं नाही तर त्याच्याच पक्षानं काढलेलं आहे.
कसं पडलं होतं वाजपेयींचं सरकार?
खरं तर सत्ता जाताना दिसताच इम्रान खान भारताच्या प्रेमात पडलेले दिसतायत आणि तेच नेमकं तिथल्या विरोधकांना खटकतंय. ज्या वाजपेयी सरकार पडण्याचा प्रसंग पाकिस्तानमध्ये चर्चिला जातोय तो 1996 सालचा आहे. वाजपेयींच्या नेतृत्वात एनडीए सर्वाधिक जागा घेऊन समोर आलं होतं. राष्ट्रपतींनी मग सरकार बनवण्याचं निमंत्रण दिलं. वाजपेयींनी सरकार बनवलं. राष्ट्रपतींनी बहुमत सिद्ध करायला सांगितलं पण वाजपेयींचं सरकार एका मतानं पडलं. तेही तेरा दिवसानंतर. त्यादिवशी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची जगभर स्तुती झाली. एका मताचं महत्व जगाला लक्षात आलं. त्यानंतर मग काँग्रेसच्या पाठिंब्यावर संयुक्त मोर्चाचं सरकार सत्तेवर आलं. गुजराल, एचडी देवेगौडा असे दोन पंतप्रधान बदलले पण राजकीय स्थिरता मिळाली नाही. 1998 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि वाजपेयींच्या एनडीएनं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
तर भारतात चालते व्हा !
इम्रान खानला आलेल्या भारतीय प्रेमाच्या उमाळ्यावर मरियम नवाज यांनी थेट भारतात जायला सांगितलं. भारत एवढाच आवडतो तर मग तिथंच शिफ्ट व्हा आणि पाकिस्तानमधलं आयुष्य सोडून द्या असही मरियम म्हणाल्या. इम्रान खान यांनी म्हटलं होतं की भारतीय ही स्वाभिमानी कौम आहे. पण आरएसएसची विचारधारा आणि काश्मीवरबद्दल भारत सरकार जे काही करतं त्यावरुन मात्र निराश आहे. त्यामुळेच आपले संबंध खराब आहेत. नसेल तर माझी भारतासोबत कुठलीच दुश्मनी नाही.
हे सुद्धा वाचा:
इम्रान खान यांना पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचा दणका, 9 एप्रिलला अविश्वास प्रस्तावावर मतदान