Sri Lanka crisis : काय ते राष्ट्रपती भवन काय ते पीएम निवासस्थान, अन् ती जेवणाची व्यवस्था संमद ओक्के; आंदोलकांचा राष्ट्रपती भवनात मुक्काम
आंदोलकांनी आता थेट श्रीलंकेच्या (Sri Lanka) राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानालाच आपले मुक्कामाचे ठिकाण बनवले आहे. आंदोलकांचा राष्ट्रपती भवनात धुमाकूळ सुरू आहे. इथे त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
कोलंबो : सध्या श्रीलंका (Sri Lanka) एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. भाजीपाल्यापासून ते अन्नधान्रापर्यंत आणि पेट्रोल-डिझेलपासून ते दैनंदीन वापराच्या वस्तुंपर्यंत सर्वच गोष्टींचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. आता तेथील नागरिकांचा संयम सुटला असून, शनिवारी त्यांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. आंदोलकांनी घेराव घालताच श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Gotbaya Rajapaksa) यांनी राष्ट्रपती भवनातून पलायन केले. ते 13 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. मात्र जोपर्यंत गोटाबाया राजपक्षे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत राष्ट्रपती भवन आमच्याच ताब्यात राहणार असल्याचे आंदोलकांनी (Protesters) म्हटले आहे. या आंदोलकांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आंदोलकांनी केवळ राष्ट्रपती भवनच नाही तर पंतप्रधानांचे निवासस्थान देखील ताब्यात घेतले आहे. या दोन्ही ठिकाणाला एका पिकनिक स्पॉटचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
फोटो व्हायरल
पंतप्रधानांच्या निवासस्थानातील देखील काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये आंदोलक मस्ती करताना दिसत आहेत. तर काही आंदोलक हे आरामात बसल्याचे पहायला मिळत आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये काही लोक हे आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. तर काही जण पंतप्रधान कार्यालयात लावलेल्या एसीचा आंनंद घेत असल्याचे पहायला मिळत आहे. काही आंदोलकांनी तर आपल्यासोबत बॅगा देखील भरून आणल्या आहेत. त्यांच्याकडील बॅगा पाहून ते अनेक दिवस या वास्तुंमध्ये मुक्काम करण्याच्या इराद्यानेच आले असावेत असे वाटते. पीएम हाऊसमध्ये या आंदोलकांच्या मोफत आणि चांगल्या दर्जाच्या जेवनाची सोय देखील झाली आहे. काही जेवतानाचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत.
श्रीलंकेत परिस्थिती गंभीर
दरम्यान सध्या श्रीलंकेची परिस्थिती गंभीर आहे. सरकारकडे विदेशी चलनाचा साठा पुरेसा नसल्याने वस्तू आयात करण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. देशात दैनंदीन लागणाऱ्या वस्तू, पेट्रोल, डिझेल आणि अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दिवस-दिवस रांगा लावून देखील पेट्रोल, डिझेल मिळत नाहीये. त्यामुळे आता जनतेच्या संयमाचा बंध फुटला आहे. शुक्रवारी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला होता. तर त्याच रात्री पंतप्रधानांचे निवासस्थान पेटून देण्यात आले होते. या घटनेनंतर पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. तर राष्ट्रपती राजपक्षे हे येत्या 13 तारखेला राजीनामा देणार आहेत.